पावसाचा रुद्रावतार! मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी; वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त, रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा

कधी दमदार, तर कधी अधूनमधून बरसणाऱ्या वरुणराजाचा खरा रुद्रावतार सोमवारी (दि.१९)नागरिकांना अनुभवायला मिळाला. रविवार रात्रीपासून दमदार बरसणाऱ्या पावसाचा जोर सोमवारी पहाटेपासून वाढला आणि मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईसह राज्यातील अनेक भागांना त्याने अक्षरशः झोडपून काढले. मराठवाडा, लातूर, रायगड, कोकणात पावसाने थैमान घातले.
छायाचित्र : दीपक कुरकुंडे
छायाचित्र : दीपक कुरकुंडे
Published on

मुंबई : कधी दमदार, तर कधी अधूनमधून बरसणाऱ्या वरुणराजाचा खरा रुद्रावतार सोमवारी (दि.१९) नागरिकांना अनुभवायला मिळाला. रविवार रात्रीपासून दमदार बरसणाऱ्या पावसाचा जोर सोमवारी पहाटेपासून वाढला आणि मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईसह राज्यातील अनेक भागांना त्याने अक्षरशः झोडपून काढले. मराठवाडा, लातूर, रायगड, कोकणात पावसाने थैमान घातले. आता मंगळवारीही तब्बल १५ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, कल्याणमध्ये मंगळवारीही शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी विहार तलाव ओसंडून वाहू लागला. दरम्यान, राज्यात गेल्या पाच दिवसांत हिंगोली २, नांदेड ३ आणि बीडमध्ये एक जण असे एकूण ७ जणांचा पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये मृत्यू झाला आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढला असून २१ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम असणार आहे. त्यामुळे राज्याला पुढचे तीन दिवस धोक्याचे असणार आहेत. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते तीव्र झाले आहे तसेच मान्सूनही सक्रिय झाला आहे. पूर्व-पश्चिम अशी द्रोणीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कोकण ते उत्तर केरळपर्यंतच्या किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस बरसत आहे.

मुंबई शहर तसेच उपनगर, ठाणे, पालघर, नवी मुंबई तसेच रायगड जिल्ह्यात पावसाची कोसळधार कायम असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईच्या सखल भागात पाणी साचल्याने रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी झाल्याने प्रवाशांना एकाच जागेवर किमान १ तास थांबावे लागले. वांद्रेकडून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच जोरदार पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांची वाहतूक कोंडीमुळे अडचण झाली. दुपारनंतर पावसाचा जोर आणखीन वाढल्याने महानगरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना दुपारच्या सत्रानंतर सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच महापालिकेसह शासकीय कर्मचाऱ्यांनाही लवकर घरी जाण्याचे आदेश देण्यात आले.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असून सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. पहाटेपासून कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक भागातील वाहतुकीवर परिणाम झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. अंधेरी भुयारी मार्गात पाणी साचल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली. तसेच, हिंदमाता, किंग्ज सर्कल, मानखुर्द, वडाळा आदी विविध भागांत गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना वाट काढताना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना केले आहे.

ठाणे जिल्ह्यालाही पावसाने चौफेर झोडपून काढले. ठाण्यातील कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा या स्थानकांवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत असून कळवा पूर्व येथे शाळेतील मुलांना घरी पाठवण्यासाठी अक्षरशः बोटीचा वापर करावा लागला.

सतत बरसणाऱ्या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भाग जलमय झाले असून राज्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाडा विभागात बीड, लातूर, नांदेडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्रात चार लाख हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, आपत्ती व्यवस्थापन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

आंबा घाटात दरड कोसळली

रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल होत असून संगमेश्वरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. पावसाचा जोर कायम असल्यामुळे दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी डोंगराचा काही भाग अद्यापही कोसळत असल्यामुळे वाहतूक पूर्ववत करण्यात अडचणी येत आहेत. दापोलीत नद्या, नाल्यांना पूर आल्याने गावांमध्ये जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.

मराठवाड्यात ६ जणांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे मराठवाड्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नांदेड जिल्ह्यातील ३, बीडमधील २ आणि हिंगोलीतील एका व्यक्तीचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे ढगफुटी झाल्यामुळे लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. एसडीआरफची २ पथके नांदेडमध्ये कार्यरत आहेत. एनडीआरएफचे पथक बीडमध्ये मदतकार्य करत आहे.

रायगडमध्ये पावसाचा कहर

रायगड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, सोमवारी तीन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सावित्री नदी (महाड), अंबा नदी (रोहा) आणि कुंडलिका (रोहा) या तीन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पेण तालुक्यातील कामार्लीमधील हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे महाड, पोलादपूर तालुक्यांत अनेक ठिकाणी पाणी भरले आहे.

शेतातील पिके झाली आडवी; बळीराजा संकटात

मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली आहेत. शेतकऱ्यांच्या फळबागासुद्धा दमदार पावसामुळे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे आडव्या झाल्या आहेत. गणेशोत्सव ऐन तोंडावर आल्याने फुलबागांचे प्रचंड नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. तसेच पालेभाज्या, कोथिंबीर, टोमॅटोची पिके पावसाच्या पाण्यात तरंगत असल्यामुळे आता गणपतीदरम्यान प्रचंड महागाईचा सामना करावा लागणार आहे.

सलाम खाकी वर्दीला !

माटुंगा पोलीस ठाण्याजवळील डॉन बॉस्को शाळेची बस मुसळधार पावसाच्या पाण्यात अडकली. या बसमध्ये सहा लहान मुले, दोन महिला कर्मचारी आणि बसचालक जवळपास तासभर पाण्यात अडकून पडले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पवार यांच्यासह माटुंगा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सर्व मुलांना खाद्यांवर घेत सुरक्षित बाहेर काढले. सदैव मुंबईकरांच्या रक्षणासाठी धावून जाणाऱ्या मुंबई पोलिसांच्या या कृतीचे राज्यभर कौतुक होत असून अनेकांनी त्यांच्या खाकी वर्दीला सलाम ठोकला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईत आजही शाळांना सुट्ट्या

तब्बल सात ते आठ जिल्ह्यांना मंगळवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई, कल्याण आणि बुलढाण्यात मंगळवारीही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व खासगी तसेच सरकारी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

नांदेडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; ५ जण बेपत्ता

रविवारी नांदेड जिल्ह्यात २०६ मिमी पावसाची नोंद झाली असून ढगफुटीसदृश स्थिती निर्माण झाल्याने सुमारे ८०० गावांना फटका बसला. त्यामुळे एनडीआरएफ टीमच्या मदतीला अखेर लष्कराला पाचारण करण्यात आले. रावणगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ येथील जनजीवन विस्कळीत झाले असून पाच लोक बेपत्ता आहेत. १५० हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. रावणगाव येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या २५० नागरिकांना शासकीय इमारती, शाळांमध्ये स्थलांतर केले आहे. हासनाळ येथे ८ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. भासवाडी येथे २९ नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. भिंगेली येथे ४० नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत.

मुंबईत ९ विमानांचे लँडिंग रद्द

मुंबईत सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका हवाई वाहतुकीलाही बसला. धुव्वाधार पाऊस आणि खराब हवामानामुळे नऊ विमानांचे लैंडिंग रद्द करण्यात आले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहा विमानांना गो-अराऊंड करण्यात आले.

रेल्वेसेवा विस्कळीत; प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर विविध ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना रुळावरून चालत नजीकचे रेल्वे स्थानक गाठावे लागले, तर पावसामुळे लोकलचे वेळापत्रक बिघडल्याने इच्छित स्थळी पोचण्यास अधिक वेळ लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. हार्बर मार्गावर मानखुर्द, गोवंडी, कुर्ला, टिळक नगर स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी भरले होते. त्यामुळे हार्बर रेल्वेसेवा १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू होती. पश्चिम रेल्वेही ५ ते १० मिनिटांच्या उशिराने धावत होती.

  • पुढील तीन दिवस अतिवृष्टीचे

  • विहार तलाव 'ओव्हरफ्लो'

  • मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिकला 'रेड अलर्ट'

  • राज्यातील १५ जिल्ह्यांत रेड आणि ऑरेंज अलर्ट

  • नागरिकांनी घराबाहेर पडू नये : मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  • नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात २५० लोक अडकले

  • १५० हून अधिक जनावरांचा मृत्यू

  • गेल्या पाच दिवसांत पावसाचे ७ बळी

logo
marathi.freepressjournal.in