आचरेकर सरांच्या कामाची शासनाकडून दखल; शिवाजी पार्क येथे होणार स्मारक, तेंडुलकरने शेअर केली भावुक पोस्ट

भारताला सचिन तेंडुलकरसारखा महान क्रिकेटपटू देण्यासह असंख्य खेळाडूंच्या कारकीर्दीला दिशा दाखवणारे गुरू म्हणजे स्वर्गीय रमाकांत आचरेकर सर.
आचरेकर सरांच्या कामाची शासनाकडून दखल; शिवाजी पार्क येथे होणार स्मारक, तेंडुलकरने शेअर केली भावुक पोस्ट
Published on

मुंबई : भारताला सचिन तेंडुलकरसारखा महान क्रिकेटपटू देण्यासह असंख्य खेळाडूंच्या कारकीर्दीला दिशा दाखवणारे गुरू म्हणजे स्वर्गीय रमाकांत आचरेकर सर. महाराष्ट्र शासनाने सरांच्या कामाची दखल घेत दादर येथील शिवाजी पार्कमध्ये त्यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तेंडुलकरनेसुद्धा शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आचरेकरांनी सचिनव्यतिरिक्त प्रवीण अमरे, विनोद कांबळी आणि चंद्रकांत पंडित यांसारख्या अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिले. आचरेकर यांचे २ जानेवारी, २०१९ रोजी मुंबईत निधन झाले. शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ५ येथे आचरेकर यांचे सहा फूट उंचीचे स्मारक बांधण्यात येणार असून हे काम वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी मुंबई पालिकेच्या आयुक्तांची असेल.

“आचरेकर सरांचा माझ्यासह असंख्य खेळाडूंच्या आयुष्यावर फार मोठा प्रभाव आहे. शिवाजी पार्क हा सरांचा बालेकिल्ला होता. त्यामुळे आपल्या स्मृती याच ठिकाणी चिरंतन राहाव्यात, हीच त्यांची इच्छा असेल. स्मारकाच्या निमित्ताने कर्मभूमीत त्यांचा वारसा जपला जाईल. त्यामुळे शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मी फार आनंदी आहे,” अशी सोशल मीडिया पोस्ट सचिनने गुरुवारी केली.

logo
marathi.freepressjournal.in