
मुंबई : मुंबई महापालिकेने गेल्या सहा महिन्यांत मुंबईत २ लाख ५० हजार उंदरांचा नायनाट केल्याचा दावा केला आहे. परंतु, पालिकेच्या या दाव्यावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी गेल्या तीन महिन्यांतील मोहिमेची चौकशी करण्याचे आदेश महापालिकेचा दिले आहेत. तसेच पालिका मलेरिया, डेंग्यू रोखण्यासाठी २५ टक्के उपाययोजना वाढवणार आहे. मुंबईत डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
१ जून ते २१ जून या कालावधीत मुंबईत मलेरियाचे ५५४ रुग्ण आढळून आले असून डेंग्यूचे ७१, तर चिकनगुनियाचे ६, लेप्टोस्पायरसिसचे २४, गॅस्ट्रोचे ६२० रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारी २०२४ ते मे या कालखंडात मलेरियाचे १६१२ रुग्ण आढळले होते, तर यावर्षी - १९१३ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे ३३८ रुग्ण मागील वर्षी आढळून आले होते, तर जानेवारी ते मे २०२५ या कालखंडात ३४७ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिकेने १ जून ते २१ जून २०२५ या कालखंडामध्ये सहा लाख ३९ हजार ४३० घरांचे सर्वेक्षण केले असून एकूण ३० लाख ५६ हजार ५२८ लोकांचे सर्वेक्षण केल्याचे महापालिकेने सांगितले. यामध्ये एकूण १ लाख २ हजार २४३ रक्त नमुने गोळा केले असून लेप्टो संशयित रुग्णांची संख्या ६२,४८४ आहेत. यासाठी ३८ शिबिरे घेण्यात आली असून विविध कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन ५१०८ ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती दिली. तर गॅस्ट्रोसाठी वितरीत केलेल्या ओआरएस गोळ्यांची एकूण संख्या २१,४२९ आहे. १ जून ते २१ जून या कालावधीत या उपायोजना करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
मलेरिया नियंत्रणासाठी १७हजार ८२ इमारतीची तपासणी केल्याची माहिती पालिकेने दिली. डास मारण्यासाठी ३५ हजार ९११ इमारतीच्या परिसरात धूर फवारणी करण्यात आली असून ५ लाख ५८ हजार २६१ झोपडपट्टी विभागात फवारणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपाययोजना करूनही रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पालिका येत्या काही दिवसांत या सर्व उपाययोजना २५ टक्क्यांनी वाढवणार आहे.
किती उंदीर मारले?
महापालिकेने गेल्या सहा महिन्यांत २ लाख ५० हजार उंदरांचा खात्मा केला. ही सर्व आकडेवारी एकूणच संशयास्पद असून उंदीर किती मारले? कुठे टाकले? किती विभागात ती कारवाई करण्यात आली? याचे चित्रीकरण करण्यात आले होते का? या सर्वांची तीन महिन्यांची चौकशी करण्यात यावी. पिंजरा कुठे लावला असे कधी पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे हे सर्वच प्रकरण संशयास्पद असून याची चौकशी करून अहवाल सादर करा, असे निर्देश मंत्री शेलार यांनी यावेळी अतिरिक्त आयुक्तांना दिले.