जिंकलंस भावा! कर्जतच्या तरुणाने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर केली महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून वाचवले दोन जीव
‘थ्री इडियट्स’ सिनेमात आमिर खानने साकारलेल्या रँचोने व्हिडिओ कॉलवरून केलेली प्रसूती तुम्हाला आठवते का? अगदी तोच थरारक प्रसंग मुंबईत प्रत्यक्षात घडलाय. राम मंदिर रेल्वे स्थानकावर एका तरुणाने जे काही केलं त्यामुळे देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा अक्षरशः वर्षाव होतोय. अख्खं सोशल मीडिया या तरुणाच्या धाडसाला आणि हिंमतीला सलाम करतंय.
लोकल ट्रेनमध्ये प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेला बघून या तरुणाने आपल्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला आणि तिच्या सूचनांचं तंतोतंत पालन करीत कोणताही वैद्यकीय अनुभव नसतानाही महिलेची यशस्वी प्रसूती केली. रात्री १ च्या सुमारास महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला अन् आई व बाळ दोघांचेही प्राण वाचले.
नेमकं काय झालं?
ही हृदयस्पर्शी घटना १५ ऑक्टोबरची मध्यरात्र उलटून गेल्यावर घडली. रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने लोकलने प्रवास करत होती. प्राथमिक माहितीनुसार, महिलेला सुरुवातीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. पण, रुग्णालयाने दाखल करुन घेण्यास नकार दिल्यामुळे कुटुंबीय तिला ट्रेनने परत आणत होते. तेवढ्यात या महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्या. वेदनेने ती विव्हळत होती, पण कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे येत नव्हते. तेव्हा त्याच डब्यात प्रवास करणाऱ्या विकास बेंद्रे (रा. सुपे , ता.कर्जत) या तरुणाने प्रसंगावधान राखत ट्रेनची इमर्जन्सी चेन ओढून ती राम मंदिर स्टेशनवर थांबवली.
डॉक्टर मैत्रिणीला केला व्हिडिओ कॉल
परंतु, रेल्वे स्थानकावर तातडीने कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती. तसेच रुग्णवाहिका पोहोचायलाही वेळ लागणार होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विकासने आपल्या डॉक्टर मैत्रीण डॉ. देविका देशमुख यांना फोन केला. मध्यरात्र असूनही डॉक्टर देविका यांनी माणुसकीच्या नात्याने घटना ऐकून घेतली आणि व्हिडिओ कॉलवर मार्गदर्शन सुरू केले. वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासने त्या प्रत्येक सूचनांचे अचूक पालन केले आणि महिलेची प्रसूती करण्यात यश मिळवले. काही मिनिटांतच महिलेने एका गोड बाळाला जन्म दिला.
मी आयुष्यात पहिल्यांदाच असं काही केलं
प्रसंगाच्या वेळी उपस्थित प्रवाशांनी सांगितले की, “बाळाचे डोके अर्धे बाहेर आले होते, पण विकासने शांतपणे आणि डॉक्टरच्या सांगण्याप्रमाणे काम केले.” या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. “मी आयुष्यात पहिल्यांदाच असं काही केलं. खूप भीती वाटत होती, पण मॅडमने व्हिडिओ कॉलवर मला मदत केली”, असं व्हिडिओमध्ये विकास म्हणताना ऐकू येत आहे. अंगाचा थरकाप सुटलेला असूनही दोन जणांचा जीव वाचवल्याचं समाधान आणि आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
युनिफॉर्म नसलेला देवदूत
यानंतर रेल्वे प्रशासन आणि सीआरपीएफ जवानांनी आई-बाळाला जवळच्या रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी सांगितले की, दोघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत. सोशल मीडियावर लोकांनी विकासवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “हा खरा हिरो आहे”, "रिअल लाइफ रँचो", “युनिफॉर्म नसलेला देवदूत”, “माणुसकी अजून जिवंत आहे”, अशा असंख्य प्रतिक्रियांद्वारे नेटकरी व्यक्त होत आहेत. दरम्यान, राम मंदिर स्टेशनवरील या घटनेमुळे माणुसकी अद्यापही जिवंत असल्याचं अधोरेखीत झालं आणि दोन जीव वाचले.
बघा व्हिडिओ