मुंबापुरीवरील विजेचे संकट कायमस्वरूपी टळले; ‘मुंबई ऊर्जा मार्ग ट्रान्समिशन’ प्रकल्प पूर्णतेमुळे सुविधा उपलब्ध

मुंबईतील वाढत्या वीज मागणीच्या यापार्श्वभूमीवर शहरासाठी अतिरिक्त २ हजार मेगावॉट वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
मुंबापुरीवरील विजेचे संकट कायमस्वरूपी टळले; ‘मुंबई ऊर्जा मार्ग ट्रान्समिशन’ प्रकल्प पूर्णतेमुळे सुविधा उपलब्ध
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईतील वाढत्या वीज मागणीच्या यापार्श्वभूमीवर शहरासाठी अतिरिक्त २ हजार मेगावॉट वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या ‘मुंबई ऊर्जा मार्ग ट्रान्समिशन’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पूर्णतेमुळे ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

या प्रकल्पामुळे भविष्यातील वाढत्या वीज मागणीनुसार मुंबईला अखंडित वीजपुरवठा देणे शक्य झाले आहे. या प्रकल्पात पडघा येथील ठप्प असलेलेल्या वीज उपकेंद्रातून अंबे (अंबरनाथ)पर्यंत ४०० किलोव्हॅट (केव्ही) क्षमतेच्या चार वीज पारेषण वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. तिथून पनवेलजवळील टेंभोडेपर्यंत दोन व खारघरपर्यंत दोन वाहिन्या आहेत. अंभोडेपर्यंत आलेल्या दोन वाहिन्याही तिथून पुढे खारघरला जोडण्यात आल्या आहेत. खारघरहून विक्रोळीपर्यंत अन्य प्रकल्पांमुळे दोन वाहिन्यांमधून वीजपुरवठा होत आहे. अशाप्रकारे पडघा ते अंबे, अंबे ते अंभोडे व अंभोडे ते खारघर आणि अंबे ते खारघर व पुढे विक्रोळी अशा ४०० केव्ही क्षमतेच्या एकूण चार वाहिन्या 'मुंबई ऊर्जा मार्ग ट्रान्समशिन' या आंतरराज्य प्रकल्पात उभारण्यात आल्या आहेत. या पारेषण वाहिन्या अत्याधुनिक कंडक्टरच्या साह्याने बसवण्यात आल्याने त्या प्रत्येक वाहिनीची वीजवहन क्षमता १ हजार मेगावॉट आहे. त्यानुसार ४ हजार मेगावॉट वीज मुंबईत आणता येईल. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचा हा प्रकल्प ऊर्जा सुरक्षेच्या दिशेने एक मोठे पाऊल मानला जात असून मुंबईच्या प्रगतीला चालना देण्यास हातभार लागेल.

याविषयी अधिक माहिती देताना स्टरलाईट पॉवरचे उपाध्यक्ष निनाद पितळे म्हणाले, मुंबईतील वीज वाहिन्यांची मर्यादित क्षमता लक्षात घेता ‘मुंबई ऊर्जा मार्ग ट्रान्समिशन’ प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या प्रकल्पाच्या कार्यान्वयनापूर्वी शहरात महापारेषणच्या चार वाहिन्यांद्वारे (प्रत्येकी ४०० केव्ही) कमाल ३२०० मेगावॉट वीजपुरवठा केला जात होता.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि महत्त्व

अखंडित वीजपुरवठा : प्रकल्पामुळे विद्युत तुटवड्याची समस्या दूर होणार असून औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी क्षेत्रांना सातत्याने वीजपुरवठा मिळेल.

वाढत्या मागणीचा विचार : मुंबईसारख्या महानगराची वीज मागणी सतत वाढत आहे. प्रकल्पामुळे भविष्यातील गरजांनाही पूर्ण करण्याची तयारी झाली आहे.

ऊर्जेचा कार्यक्षम वापर : ऊर्जेच्या वहनात सुधारणा झाल्यामुळे वीजपुरवठ्याचा कार्यक्षम वापर सुनिश्चित केला जाईल. मुंबई आणि आसपासच्या एमएमआर परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या ४० वर्षे जुन्या झाल्या होत्या.

logo
marathi.freepressjournal.in