
मुंबई : मुंबई महापालिकेत मागील नऊ महिन्यांत म्हणजेच १ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत एकूण ५ हजार ८४७ कोटी ६८ लाख रुपये इतक्या रकमेच्या मालमत्ताकराचे संकलन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सोमवार ३० डिसेंबरला एका दिवसात १७३ कोटी ५९ लाख रुपये तर मंगळवार, ३१ डिसेंबरला २६० कोटी २८ लाख रुपयांचा कर भरणा मालमत्ताधारकांनी केला आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
पालिकेच्या वतीने कर संकलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. गत आर्थिक वर्ष (२०२३-२४) मधील मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत ही २५ मे २०२४ पर्यंत होती. त्यामुळे मागील आर्थिक वर्षातील सुमारे १ हजार ६६० कोटी रुपये रक्कम देखील यात समाविष्ट आहे. याचाच अर्थ विद्यमान आर्थिक वर्षाचे (२०२४-२५) कर संकलन हे ४ हजार १८७ कोटी १९ लाख रुपये इतके झाले आहे. विद्यमान आर्थिक वर्षाचे (२०२४-२५) मालमत्ता कर संकलन उद्दिष्ट हे सुमारे ६ हजार २०० कोटी रुपये इतके आहे. त्या तुलनेत आतापर्यंत ६८ टक्के कर संकलन झाले आहे.
मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत कर भरणा करता यावा यासाठी महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाच्या वतीने वेळोवेळी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. मालमत्ताधारकांच्या सोयीसाठी शनिवारी देखील प्रशासकीय विभाग कार्यालय तसेच नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात आली होती. तसेच यासंबंधीत अडचणींचा निपटारा करण्यासाठी कर निर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी अविरत कार्यरत आहेत.
रात्री उशिरापर्यंत कर भरणा सुरू
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी अंतिम देय ३१ डिसेंबर २०२४ हा होता. कर भरणा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय, सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रे रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे सोमवार, ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून तर रात्री १० वाजेपर्यंत या कालावधीत १७३ कोटी ५९ लाख रुपये आणि मंगळवार, ३१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत या वेळेत २६० कोटी २८ लाख रुपयांचा मालमत्ता कर नागरिकांनी भरला, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
असे झाले करसंकलन
१ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या एकाच महिन्यात २ हजार ५०१ कोटी ०७ लाख रुपयांचा विक्रमी कर वसूल
१ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत शहर विभागात १ हजार ७७४ कोटी ४३ लाख रुपयांचा कर जमा
१ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत पूर्व उपनगरे विभागात १ हजार ०९१ कोटी १० लाख रुपयांचे करसंकलन
दिनांक १ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत पश्चिम उपनगरे विभागात २ हजार ९७९ कोटी ४५ लाख रुपयांचे करसंकलन