influenza : खासगी रुग्णालयांकडून लूट सुरू ; इन्फल्युएंझाची चाचणीसाठी ४ ते ६ हजार रुपये

सरकारने ‘एच३एन२’चे नेमके किती रुग्ण आहेत याची निश्चित माहिती दिली नाही. तसेच त्याची लक्षणे निश्चितपणे ओळखता येत नाही
influenza : खासगी रुग्णालयांकडून लूट सुरू ; इन्फल्युएंझाची चाचणीसाठी ४ ते ६ हजार रुपये
Published on

राज्यात इन्फल्युएंझाचा कहर सुरू झाल्यानंतर खासगी रुग्णालयांकडून लुटालूट सुरू झाली आहे. या आजाराच्या चाचण्यांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. काही खासगी रुग्णालयांनी एका चाचणीसाठी ४ ते ६ हजार रुपये आकारला सुरुवात केली आहे.

एका जेष्ठ डॉक्टरने सांगितले की, या चाचणीचे दर महाग असल्याने अनेक रुग्ण ही चाचणी करण्यापासून परावृत्त होत आहेत. त्यामुळे मीही ही चाचणी करण्याची शिफारस रुग्णांना करत नाही. ‘एच३एन२’ आजारासाठी खास चाचणी नाही. सर्व विषाणूंच्या चाचण्या या महाग आहेत. उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्यास चाचण्या केल्या जाव्यात, अशी शिफारस मी करत आहे, असे या डॉक्टरने पुढे स्पष्ट केले.

एखाद्या कुटुंबातील एकाला इन्फल्युएंझाची लागण झाल्यास प्रत्येकाची चाचणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी २० ते ४० हजार रुपयांची गरज लागणार आहे. रुग्णालये चाचण्यांद्वारे अधिक कमाई करण्याची संधी घेत आहेत. हा प्रकार थांबवण्याची गरज आहे, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

सरकारने ‘एच३एन२’चे नेमके किती रुग्ण आहेत याची निश्चित माहिती दिली नाही. तसेच त्याची लक्षणे निश्चितपणे ओळखता येत नाही, असे एका आरोग्य तज्ज्ञांने सांगितले.

राज्याचे माजी आरोग्य संचालक डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले की, ‘एच३एन२’ हा नवीन विषाणू नाही. गेल्या अनेक वर्षांपासून याचे रुग्ण आढळत आहेत. कोविडप्रमाणे ‘एच१एन१’, ‘एन३एन२’ या आजारात फुफ्फुसाला संसर्ग करण्याची क्षमता असून त्यात गुंतागुंत वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी मास्क घालणे, हात सतत धुणे व स्वच्छता बाळगणे आदी काळजी घेणे आहे. सरकारकडे अशा विषाणूंवर लक्ष ठेवणारी वर्षभर यंत्रणा असायला हवी. तसेच स्वाईन फ्लूची चाचणी सध्या ३५०० ते ५ हजार रुपयांना आहे. ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही. या चाचणीची किंमत कमी व्हायला हवी, असे त्यांनी सांगितले. इन्फल्युएंझाची चाचणी करण्याच्या केवळ ६० प्रयोगशाळा आहेत. त्यातील अर्ध्या सरकारी व उर्वरित खासगी आहेत.

मेट्रोपोलीस लॅबचे संचालक निलेश शहा म्हणाले की, आम्ही इन्फल्युएंझाच्या चाचणीसाठी ५५०० रुपये आकारत आहोत. तर मायलॅब्जने सांगितले की, आम्ही प्रति चाचणी १ हजार रुपये केवळ रुग्णालयांसाठी आकारत आहोत.

logo
marathi.freepressjournal.in