मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बेकरी व्यवसायिकांना हरित इंधन स्रोतांकडे वळण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यास नकार दिला असतानाच मुंबईत अनेक बेकऱ्या अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. केवळ ५७३ बेकऱ्या या नोंदणीकृत असून त्यापैकी २६२ बेकऱ्यांनी हरित इंधनाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. अद्यापही ३११ बेकरी व्यवसाय पारंपरिक इंधनावर चाल आहेत, अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.
मुंबई उच्च न्यायालयाने बेकरी व्यवसायिकांना पर्यावरणपूरक आणि हरित ऊर्जेचा वापर करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार मुंबईतील अनेक बेकरी मालकांनी आपल्या पारंपरिक भट्टया बदलण्यास सुरुवात केली. मात्र, भट्टया बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये वेळ लागल्यामुळे बेकरी व्यावसायिकांनी न्यायालयाकडे मुदतवाढ करण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने व्यावसायिकांची मागणी फेटाळून निर्णय कायम ठेवला. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयानंतर व्यावसायिकांची महानगर गॅस लिमिटेडसोबत बैठक पार पडली असून, महानगर गॅसनेही बेकऱ्यांना गॅस पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे.
अनेक बेकऱ्यांची नोंद नाही!
पालिका हद्दीत केवळ ५७३ बेकऱ्या नसून त्या १५०० ते २००० च्या संख्येत आहेत. या बेकऱ्यांची नोंद पालिकेकडे नाही. तर या बेकऱ्या अद्यापही पारंपरिक इंधन लाकूड-कोळशावर अवलंबून आहेत. या सर्व बेकऱ्यांमुळे मुंबईत ६ टक्के प्रदूषण होत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली.