Mumbai : विस्तारित इमारतीच्या खर्चाचे 'मीटर' सुरूच; नूतनीकरणानंतर तीनच वर्षांत दुरुस्ती

मुंबई महापालिका मुख्यालयाच्या विस्तारित सहा मजली इमारतीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होऊन तीन वर्षे लोटत नाहीत तोच आता विविध दुरुस्तीसाठी आणखी सुमारे सात कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
Mumbai : विस्तारित इमारतीच्या खर्चाचे 'मीटर' सुरूच; नूतनीकरणानंतर तीनच वर्षांत दुरुस्ती
Mumbai : विस्तारित इमारतीच्या खर्चाचे 'मीटर' सुरूच; नूतनीकरणानंतर तीनच वर्षांत दुरुस्तीसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई: मुंबई महापालिका मुख्यालयाच्या विस्तारित सहा मजली इमारतीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होऊन तीन वर्षे लोटत नाहीत तोच आता विविध दुरुस्तीसाठी आणखी सुमारे सात कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

मुंबई महापालिकेची विस्तारित इमारत १९६० साली उभारण्यात आली होती. या इमारतीच्या सर्वंकष दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम २०१४ मध्ये हाती घेण्यात आले होते. हे काम तब्बल १० वर्षे सुरू होते. अखेर २०२३-२४ मध्ये काम पूर्ण झाले. त्यासाठी आतापर्यंत १२० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला. शानदार इंटेरिअर प्रा. लि. या कंत्राटदारामार्फत, तर शशी प्रभू अँड असोसिएट्स यांच्या प्रकल्प व्यवस्थापनाखाली हे काम टप्याटप्याने पूर्ण करण्यात आले. मात्र आता पुन्हा एकदा इमारतीतील अनेक कामे प्रलंबित असल्याचे समोर आले असून त्यासाठी आणखी ६.८३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या कामांसाठी महेंद्रा रिअल्टर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कामांमध्ये इमारतीच्या बाह्य भागावरील प्लास्टर आणि स्टोनची दुरुस्ती, जीर्ण झालेले 'सीआय' आणि 'जीआय' पाईप बदलणे, आझाद मैदानाकडील दगडी भिंतींची स्वच्छता व फ्लश पॉइंटिंग, तळघरातील सुरक्षा कक्ष, युनियन कार्यालय, दूरध्वनी कक्ष आणि पार्किंग परिसरातील संरचनात्मक दुरुस्ती, सर्व मजल्यांवरील मॉड्युलर छताची दुरुस्ती, दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचालय, तळमजल्यापासून सहाव्या मजल्यापर्यंत महिला व पुरुष स्वच्छतागृहांचे नूतनीकरण, गच्चीवरील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती, पंप रुमचे नूतनीकरण, सांडपाणी व पावसाच्या पाण्याच्या वाहिन्यांची दुरुस्ती, भूमिगत पाण्याच्या टाकीची दुरुस्ती, कँटीनमधील स्थापत्य कामे तसेच अग्निशमन यंत्रणेची उर्वरित कामे यांचा समावेश आहे.

कामे प्रलंबित का राहिली?

यापूर्वीच्या नूतनीकरणाच्या करारात अनेक आवश्यक दुरुस्तीची कामे समाविष्टच करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ती कामे प्रलंबित राहिली. सध्या इमारतीच्या उत्तर आणि पश्चिम बाजूच्या भिंतींमधून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गळती होत असून अनेक ठिकाणी भिंतींचा रंग निघाला आहे. बुरशी, ओलावा, जलनिरोधक थराचे नुकसान, खराब झालेल्या खिडक्या-दखाजे तसेच काही विद्युत यंत्रणांची दुरुस्तीही अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in