

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून बरसणाऱ्या पावसाने धरणात क्षेत्रातही एंट्री केली आहे. त्यामुळे ३० जून रोजी ६.७५ टक्क्यांवर आलेला पाणीसाठा १ जुलै रोजी ७.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा पुन्हा एकदा १ लाख ३ हजार ८७१ दशलक्ष लिटर वर पोहोचला आहे.
धरण क्षेत्रात वरुणराजाची अशीच कृपादृष्टी राहिली तर पाण्याच्या पातळीत वाढ होईल आणि मुंबईवरील पाणीकपातीचे संकट दूर होईल. दरम्यान, पवई तलाव बुधवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ओसंडून वाहू लागला.
मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणात १ जुलै रोजी १ लाख ६ हजार ८७१ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.
१ जुलै रोजी पाणीसाठा (टक्के)
अप्पर वैतरणा - ०
मोडक सागर - २०.००
तानसा - २.७२
मध्य वैतरणा - ११.७१
भातसा - ४.९०
विहार - ५०.७७
तुळशी - २८
१ जुलै रोजी सातही धरणातील तीन वर्षांतील पाणीसाठा
२०२६ - ७.१८ टक्के
२०२५ - ४१.१७ टक्के
२०२४ - ५.९१ टक्के
३० जून रोजीचा पाणीसाठा (टक्के)
२०२६ - ६.७५
२०२५ - ४०.२२
२०२४ - ५.४६