मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा; पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता

मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे मुंबईला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा मंगळवारी ९९ टक्क्यांनी वाढून १४.३० लाख दशलक्ष लिटर झाला असून, मागील तीन वर्षांतील हा सर्वाधिक साठा असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा; पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता
Published on

मुंबई : मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे मुंबईला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा मंगळवारी ९९ टक्क्यांनी वाढून १४.३० लाख दशलक्ष लिटर झाला असून, मागील तीन वर्षांतील हा सर्वाधिक साठा असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

मुंबईची दैनंदिन पाण्याची गरज मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात असलेल्या अप्पर वैतरणा, तानसा, तुळशी, मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा आणि विहार या सात तलावांद्वारे भागवली जाते. आजमितीला या सातही तलावांमध्ये एकूण पाण्याची पातळी १४.३० लाख दशलक्ष लिटरवर पोहोचली असून ती या तलावांच्या एकूण क्षमतेच्या ९८.८२ टक्के आहे. म्हणजेच सध्या पालिकेकडे ९८.८२ टक्के पाणीसाठा आहे. या सर्व सात तलावांची एकूण पाणी साठवण क्षमता १४.४७ लाख दशलक्ष लिटर इतकी असून, जेव्हा तलावात इतका पाणीसाठा जमा होईल तेव्हा ही सातही तलाव १०० टक्के भरलेली असतील, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे १६ सप्टेंबर २०२४ मध्ये तलावाची पाण्याची पातळी ९८.७१ टक्क्यांवर पोहोचली होती. तर, २०२३ मध्ये पाणीसाठा ९६.९८ टक्के राहिला. पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी मान्सून लवकर आल्याने आणि मे महिन्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाल्याने सर्व तलाव नेहमीपेक्षा लवकर भरले आणि सर्व तलावांनी जुलैच्या सुरुवातीला ७० टक्क्यांचा टप्पा ओलांडला. पहिला तलाव मोडक सागर जुलैच्या सुरुवातीला काठोकाठ भरला. पण, जून आणि जुलै महिन्यात अपुऱ्या पावसामुळे बराच काळ तलावाची पातळी सुमारे ८० टक्क्यांवर स्थिर राहिली. ऑगस्टमध्ये मुसळधार पावसानंतरच त्यात वाढ झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

उन्हाळ्यात पाणीकपातीची शक्यता कमी

जलाशयांमध्ये सध्या असलेला पुरेसा पाणीसाठा आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे आणखी काही दिवस परतीच्या मुसळधार पावसाची असलेली शक्यता लक्षात घेता येत्या उन्हाळ्यात पाणीकपातीची शक्यता कमी असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

मुंबईला ३०० दिवस पुरेल इतका पाणीसाठा

पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तलावांमधील पाण्याची पातळी ९८ टक्क्यांच्या आसपास आहे. मागील आठवड्याच्या शेवटी म्हणजे रविवारी रात्रीपासून मुंबई महानगर प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे, मंगळवारी सकाळी तलावांमधील पाण्याने २०२५ मधील सर्वोच्च पातळी गाठली. मुंबईकरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा पाणीसाठा असल्याने, सध्याचा पाणीसाठा पुढील ३०० दिवस मुंबईला पुरेल असे पालिकेने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in