मुंबई देशातील 'लक्झरिअस' बाजारपेठ, निवासी जागांच्या किमतीत २०.४ टक्के वाढ - रिपोर्ट

२ बीएचके घरांना प्राधान्य, पश्चिम उपनगराला घर खरेदीदारांसाठी सर्वाधिक मागणी
मुंबई देशातील 'लक्झरिअस' बाजारपेठ, निवासी जागांच्या किमतीत २०.४ टक्के वाढ - रिपोर्ट
Published on

मुंबई : गत दोन वर्षांत मुंबईतील निवासी जागांच्या किमती २०.४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. मागणी आणि पुरवठा यामुळे ही वाढ झाली असल्याचा निष्कर्ष मॅजिकब्रिक्स अहवालातून काढण्यात आला आहे. अहवालानुसार, गेल्या तिमाहीच्या तुलनेने या तिमाहीत सरासरी निवासी दरात ६.५ टक्के वाढ होऊन तो २६ हजार ७८० प्रति चौरस फूट इतका झाला असून, मुंबई ही देशातील एक सर्वात लक्झरिअस बाजारपेठ झाली आहे.

मुंबईत बांधकामांतर्गत (अंडर-कन्स्ट्रक्शन) प्रॉपर्टीला असलेली मागणी वाढत आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेने या तिमाहीमधील पुरवठ्यात १७ टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे गेल्या तिमाहीच्या तुलनेने या तिमाहीत बांधकामांतर्गत प्रॉपर्टीच्या किमतीत १३.२ टक्के वाढ होऊन ती २७,४२२ प्रति चौरस फूट इतकी झाली आहे.

या व्यतिरिक्त, निवासी मागणीमध्ये गेल्या तिमाहीच्या तुलनेने या तिमाहीत ६.७ टक्के वाढ झाली आहे. देशभरात गेल्या तिमाहीच्या तुलनेने या तिमाहीतील वाढ ४.० टक्के आहे. तर मुंबईतील पुरवठ्यामधील वाढ ५.३ टक्के इतकी आहे आणि राष्ट्रीय पातळीवरील वाढ ३.५ टक्के इतकी आहे. गेल्या २४ महिन्यांमधील ही सर्वाधिक वाढ आहे.

२ बीएचके घरांना प्राधान्य

या अहवालात नोंदविलेल्या निरीक्षणानुसार, २ बीएचके युनिट्सना स्पष्ट प्राधान्य दिसून येत आहे. एकूण मागणीच्या ४३.५ टक्के मागणी २ बीएचके घरांसाठी आहे. तर ३ बीएचके घरांची किंमत २८,९०० प्रति चौरस फूट इतकी आहे, तर २ बीएचके घरांची किंमत २१,८०० प्रति चौरस फूट इतकी आहे, अशी नोंद या पोर्टलने केली आहे.

पश्चिम उपनगराला घर खरेदीदारांसाठी सर्वाधिक मागणी

या अहवालानुसार, मालाड-कांदिवली (रु.१८,८०० प्रति चौरस फूट इतकी सरासरी किंमत), अंधेरी पश्चिम - जोगेश्वरी पश्चिम (रु.२५,६०० प्रति चौरस फूट इतकी सरासरी किंमत) आणि बोरिवली दहिसर (रु.२०,८००) प्रति चौरस फूट इतकी सरासरी किंमत) ही मुंबईतील पश्चिम उपनगरे घर खरेदीदारांसाठी सर्वाधिक मागणी असलेली मायक्रो-मार्केट ठरली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in