

मुंबई : गणरायाच्या आगमनाचा उत्साह ‘डीजे’च्या कर्णकर्कश आवाजात नव्हे, तर ढोल-ताशांच्या पारंपरिक निनादात साजरा व्हावा, अशी जोरदार हाक आता मुंबईतूनही दिली जात आहे. पुण्यात डीजेविरुद्ध भूमिका घेतल्यानंतर आता गणेशोत्सवात डीजेचा वापर टाळण्यासाठी ‘अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ’ पुढे सरसावला आहे. महासंघामार्फत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना डीजेमुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच काही मंडळेही ‘डीजे बंदी’साठी सरसावली आहेत.
‘डीजे’मुळे वाढलेला ध्वनिप्रदूषणाचा त्रास, कर्णकर्कश्श संगीतामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना होणाऱ्या असह्य वेदना व त्रास लक्षात घेऊन ‘डीजे’ विरोधात पुणे शहरात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. ‘डीजे’ बंदची हाक मुंबईतही देण्यात आली आहे. यामध्ये अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघानेही महत्वाची भूमिका घेतली आहे. ‘डीजे’ ऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देऊन गणेशोत्सवाचे सांस्कृतिक वैभव जपण्यावर भर द्यावा, असे आवाहन महासंघाने केले आहे.
पुण्यानंतर मुंबईतही सुरू झालेल्या या भूमिकेमुळे यंदाच्या गणेशोत्सवात ‘डीजे’ विरुद्ध ‘परंपरा’ हा मुद्दा चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. गणरायाच्या मिरवणुका उत्साहपूर्ण असाव्यात; पण त्या ध्वनीप्रदूषणमुक्त आणि नागरिकांना त्रास न देणाऱ्या असाव्यात, असा स्पष्ट संदेश महासंघाने दिला आहे. अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ ही मुंबईमधील १२ हजार गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधित्व करत आहे. महासंघाने आगमन आणि विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडल्या पाहिजेत. ‘डीजे’ कोणी लावू नये अशी विनंती महासंघाने सर्व गणेशोत्सव मंडळांना केली आहे. याचे पालन मंडळे करतीलच असा विश्वास संघटनेचे सचिव सुरेश सरनोबत यांनी व्यक्त केला आहे.
घुमणार पद्मश्री भिकल्या धिंडांच्या तारपाचे सूर - सायन प्रतीक्षा नगरमधील ‘पंचशील नगरचा राजा’ अशी ओळख असलेल्या श्री गणेश मित्र मंडळाने यंदा ‘डीजे’ऐवजी पद्मश्री भिकल्या धिंडा यांच्या तारपा वादनाचे आयोजन केले आहे. त्यामुळे या मंडळात यंदा भक्तांना तारपाचे सूर ऐकण्यास मिळणार आहेत. त्यासोबतच विसर्जन मिरवणुकीत बेंजो आणि पारंपरिक वाद्य, भजन मंडळांचा सहभाग असणार आहे.
सुनील शेट्ये, अध्यक्ष, श्री गणेश मित्र मंडळ, प्रतीक्षा नगर, सायन