
मुंबईत भररस्त्यात रिक्षा थांबवून एका तरुणाला बदडणाऱ्या वृद्ध रिक्षाचालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये रिक्षाचालक तरुणाला एकामागोमाग एक कानफडात लगावत असल्याचे दिसते.
१६ सेकंदांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रिक्षाचालक एका तरुणाची (शालेय किंवा कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्याची) कॉलर पकडून कानशिलात लगावत असल्याचे दिसत आहे. रिक्षाचालक घाबरलेल्या विद्यार्थ्यावर मोठ्याने ओरडत एकामागून एक थप्पडची बरसात करतो. व्हिडिओमध्ये, तरूण माफी मागताना दिसतो, अगदी गुडघे टेकून, हात जोडून गयावया करताना दिसतो. तरीही रिक्षाचालकाला दया येत नाही.
फक्त बघे; मदतीला कोणीच नाही
या घटनेत सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे, रस्त्यावर वर्दळ असूनही कोणीही मध्यस्थी केली नाही. पादचारी बाजूने निघून गेले, रिक्षात बसलेले प्रवासी गप्प बसले, आणि व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्यानेही मदत करण्याऐवजी चित्रिकरण सुरू ठेवले. यावरून नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया
नेटकऱ्यांनी 'एक्स'वर (Twitter) व्हिडिओ शेअर करून आरोपी रिक्षाचालकावर कारवाईची मागणी केली आहे. मुलाचे पैसे हरवले असल्याने भाडे देता आले नाही, यामुळे त्याला बेदम मारहाण झाली, असा दावा केला जात आहे. या ट्विटला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी, “घटना नेमकी कुठे घडली आहे, कृपया माहिती द्या” अशी प्रतिक्रिया दिली आहे.