Mumbai : मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ

मुंबईत यंदा पाऊस मे महिन्यापासूनच सुरू झाल्याने कीटकजन्य आजारांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया व हिपॅटायटीस आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसून येत नाही.
Mumbai : मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईत यंदा पाऊस मे महिन्यापासूनच सुरू झाल्याने कीटकजन्य आजारांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया व हिपॅटायटीस आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसून येत नाही.

पावसाळ्यामध्ये दूषित तसेच, गढूळ पाण्यातून प्रादुर्भाव होऊन आरोग्यासंदर्भात अनेक तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे पाणी उकळून, गाळून पिण्याचे आवाहन सतत केले जात आहे. उघड्यावरचे पदार्थ खाणे, पाण्यातून संसर्ग झाल्यामुळे आरोग्याशी संबधित तक्रारी उद्भवू शकतात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे योग्यवेळी काळजी घेणे गरजेचे आहे.

यावर्षी मुंबईमध्ये जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत ५७०६ जणांना मलेरियाचा प्रादुर्भाव झाला असून २३१९ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. मागील वर्षात जानेवारी ते ऑगस्ट या महिन्यात मलेरियाच्या रुग्णांची संख्या ४०२१ इतकी होती.

डेंग्यूची लागण १९७९ जणांना, तर चिकनगुनियामुळे २१० जणांना त्रास झाला होता. या वर्षातील पहिल्या आठ महिन्यांमध्ये चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होऊन रुग्णसंख्या ४८५ झाल्याची माहिती समोर आली आहे.

दूषित पाणी तसेच उघड्यावरील अन्नसेवनामुळे पोटदुखीचा त्रास बळावलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. यावर्षी पहिल्या आठ महिन्यांत ५७७४ जणांना गॅस्ट्रो, तर ८१० जणांना हिपॅटायटीसचा त्रास झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. तसेच पावसाळ्यात दरवर्षी गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होते. पोटदुखी किंवा अतिसार असा त्रास सुरू झाल्यानंतरही काही रुग्ण आजार अंगावर काढतात. तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आव्हान पालिकेने केले आहे.

PM

अशी घ्या काळजी

  • घरामध्ये, घराच्या आजूबाजूला व इमारतींच्या परिसरात कुठेही पाणी साचलेले असणार नाही, याची दक्षता घ्यावी.

  • जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तू जमा करणे टाळावे,

  • दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधात्मक औषधांचा वापर करावा.

  • मुसळधार पावसात उघड्या पायाने चालणे टाळावे.

  • गॅस्ट्रोपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरील / उघडे अन्न खाणे टाळावे.

  • जेवण्यापूर्वी हात धुवा किंवा हँड सॅनिटायझर वापरावे.

  • पाणी उकळून प्यावे

logo
marathi.freepressjournal.in