

पूनम पोळ / मुंबई
मुंबईत रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामाची डेडलाइन ३१ मे रोजी संपूनही मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील अनेक भागांमध्ये रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांना केवळ अर्ध्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. तसेच यामुळे अनेकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरणाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार याचे ठोस उत्तर उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई महापालिकेने हाती घेतलेली रस्ते काँक्रीटीकरणाची कामे ३१ मेनंतर थांबवण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तर रस्त्यांवर काँक्रीट टाकण्याचे काम २० मे रोजी बंद केले जाणार असे जाहीर केले होते. पावसाळ्यात काँक्रीट सुकत नाही, त्यामुळे काँक्रीट टाकण्याशिवाय जी कामे शिल्लक आहेत, ती २० मेपासून ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. यासाठी अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर हे स्वतः कामाच्या ठिकाणी भेटी देऊन आढावा घेत होते.
कामे वेळेत पूर्ण करा, त्याचबरोबर कामात हलगर्जीपणा- निष्काळजीपणा नको, कामाचा दर्जा राखा, अशी सक्त ताकीद त्यांनी कंत्राटदारांना आणि पालिकेच्या अभियंत्यांना दिली होती. ज्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत, ती पूर्ण करून रस्ता मास्टिक अस्फाल्टने आच्छादित करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतरही मुंबईतील बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, माहीम, माटुंगा, परेल, भायखळा या भागातील रस्त्याची कामे पूर्ण झालेली नाहीत. परिणामी रस्त्यावर मातीचे ढीग, रस्तेकामासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, बॅरिकेड्स अजूनही पाहायला मिळत आहे. परिणामी, हलक्या पावसाच्या सरीनंतर या भागांमध्ये चिखल होत आहे आणि नागरिकांना या चिखलातून प्रवास करावा लागत आहे. तर कित्येक ठिकाणी रस्त्यालगत असलेला कचरा वेळेत न उचलल्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, तर महापालिकेने रस्ता काँक्रीटीकरणाचे टेंडर काढले आहे आणि त्यांचे कंत्राटही एकाच कंपनीला दिले असून रस्त्याची कामे एकत्र सुरू झाली. यामुळे या कामांमध्ये दिरंगाई झाली. मात्र, पालिकेच्या वतीने कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, तर काही भागात सुरू असलेली उर्वरित कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.