Mumbai : काँक्रीटीकरणाला डेडलाईन; पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश

खड्डेमुक्त रस्त्यासाठी सिमेंट काँक्रीकटचे रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. मुंबईत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे जाळे विस्तारले जात आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावा. तर दुसरा टप्पा मे २०२७ पर्यंत पूर्ण करावा, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.
Mumbai : काँक्रीटीकरणाला डेडलाईन; पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : खड्डेमुक्त रस्त्यासाठी सिमेंट काँक्रीकटचे रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. मुंबईत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे जाळे विस्तारले जात आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावा. तर दुसरा टप्पा मे २०२७ पर्यंत पूर्ण करावा, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी त्यात पारदर्शकता असणे गरजेचे आहे. कोणत्याही स्वरुपाची मुदतवाढ दिली जाणार नाही, असे सांगत आयुक्त अश्विनी भिडे यांनी या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यादरम्यान कोणतेही काम सुरू केले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. जेणेकरून नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

मुंबईतील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी व्यापक स्वरूपात नियोजन केले जात आहे. मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये हाती घेतला आहे. त्यामुळे रस्ते प्रवास अधिक सुकर होणार आहे. एकीकडे महानगरपालिका रस्त्यांची कामे करत असताना, दुसरीकडे मुंबईकरांनाही आपल्या परिसरातील माहिती व्हावी, यासाठी पालिकेने रस्त्यांची इत्यंभूत माहिती दर्शविणारी संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या दालनात आढावा बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उपआयुक्त गिरीश निकम, उपआयुक्त प्रशांत गायकवाड, प्रमुख अभियंता मंतय्या स्वामी आदींसह अभियंते उपस्थित होते. आपल्या परिसरात सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाबाबत पारदर्शक माहिती देण्यासह रस्त्यांच्या कामांबाबत मत व्यक्त करण्याची संधी या ‘डॅशबोर्ड’वर देण्यात आली आहे.

दैनंदिन प्रवासात होणार सुधारणा!

मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला आधुनिक, सुरक्षित व सुयोग्य स्वरूप देण्याच्या दृष्टिने रस्ते काँक्रीटीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील प्रमुख आणि दुय्यम मार्गांवरील वाहतूक अधिक सुरळीत, वेगवान व शिस्तबद्ध होण्यास मदत होणार असून, त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात लक्षणीय सुधारणा होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in