
मुंबई : पावसाळ्यामध्ये मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पालिकेच्यावतीने रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पांअंतर्गत ३१ मेपर्यंत एकूण १,३८५ रस्त्यांचे मिळून ३४२.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटकरण पूर्ण करण्यात आले आहे. या अंतर्गत, ७७१ रस्त्यांचे एकूण १८६ किलोमीटर लांबीचे काम १०० टक्के पूर्णत्वास गेले आहे. तर, ६१४ रस्त्यांवर चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदीपर्यंत याप्रमाणे मिळून एकूण १५६.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले असून हे सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
यावेळी, रस्ते कामे पूर्ण करताना महानगरपालिकेचा जल अभियंता विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभाग, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिःसारण प्रचालन, मलनिःसारण प्रकल्प आदी विभाग आणि उपयोगिता सेवा वाहिन्यांशी संबंधित यंत्रणा जसे की - विद्युत कंपन्या, गॅस वितरण कंपन्या, दूरध्वनी कंपन्या यांच्यावसमवेत समन्वय ठेवण्यात आला. काँक्रिटीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यांवर कोणत्याही संस्थेस खोदकाम, चर करायला मनाई करण्यात आली आहे. तसेच, महानगरपालिकेतर्फे खोदकामास परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत रस्ते कामाचा राडारोडा, बांधकाम साहित्य, रस्तारोधक हटविण्यात आले असून रस्ते संपूर्णत: वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत. रस्ते लगतच्या पर्जन्य जलवाहिन्यादेखील स्वच्छ करण्यात आल्या आहेत. विभाग कार्यालयांकडून रस्त्यांवरील अधिकृत गतिरोधकांची यादी प्राप्त झाल्यानंतर गतिरोधकांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
टप्पा एक आणि टप्पा दोनच्या कामाचा आढावा
एकूण २,१२१ रस्ते कामांचे नियोजन
६९८.४४ किलोमीटर लांबीच्यां रस्यांशास चा समावेश
१,३८५ रस्त्यांची मिळून ३४२.७४ किलोमीटरची कामे पूर्ण
पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी ४९.०७
१८६ किमी लांबीचे ७७१ रस्ते९ एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत पूर्ण
१५६.७४ किमी लांबीच्या् ६१४ दुसऱ्या रस्त्याचे काम चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदीपर्यंत पूर्ण