
पूनम पोळ / मुंबई
मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेच्या वतीने २,१२१ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यापैकी पावसाळ्यापूर्वी ७७१ रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले, तर ५७४ रस्त्याचे काम अंशतः पूर्ण झाले. या कामाना पालिकेच्या वतीने १ ऑक्टोबरपासून सुरुवात करण्यात आली असून शिल्लक रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई महापालिकेच्या वतीने खड्डेमुक्तीच्या दृष्टिकोनातून टप्पा एक आणि टप्पा दोन अंतर्गत एकूण २१२१ रस्त्यांची कामे हाती घेतली असून यातील आतापर्यंत ७७१ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत; परंतु उर्वरितपैकी ५७४ रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी अर्धवट होती, ही सर्व अर्धवट रस्त्यांची कामे १ ऑक्टोबरपासून हाती घेण्यात आली आहेत, तर हाती न घेतलेली कामे टप्प्याटप्प्याने हाती घेत मे २०२७ पर्यंत सर्व रस्त्याची कामे सिमेंट काँक्रीटची केली जाणार आहेत.
महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत दिनांक ३१ मे २०२५ अखेर एकूण १३८५ रस्त्यांचे मिळून ३४२.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या अंतर्गत, ७७१ रस्त्यांचे एकूण १८६ किलोमीटर लांबीचे काम १०० टक्के पूर्णत्वास गेले आहे. तर, ५७४ रस्त्यांवर चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदीपर्यंत याप्रमाणे मिळून एकूण १५६.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. हे सर्व रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत.
टप्पा १ अंतर्गत निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ६३.५३ टक्के तर, टप्पा २ अंतर्गत निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ३६.८४ टक्के लक्ष्यपूर्ती करण्यात आली आहे. म्हणजेच टप्पा १ आणि टप्पा २ असे एकत्रित मिळून पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी ४९.०७ इतकी आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून काँक्रीटीकरण कामे करण्यात आली असून यामुळे नागरिकांना असुविधा होणार नाही, असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला
१ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. मात्र, काँक्रीटीकरणादरम्यान पावसामुळे व्यत्यय येत आहे. त्यामुळे नवीन रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाऐवजी शिल्लक रस्त्याच्या बॅरिकेडिंग आणि उत्खननाचे काम सुरू आहे. - गिरीश निकम, प्रमुख अभियंता, रस्ते व वाहतूक विभाग
येथे सुरू झाले काम
टी विभागात ३ रस्त्याचे काम अंधेरी (पश्चिम) येथील जगन्नाथ रोड मार्ग
वांद्रे येथील के. सी. मार्ग एल विभागातील डी. पी. रोड ९चे, आर दक्षिण विभागातील ६ रस्त्याचे काम
सी विभागातील एस. के. पाटील रोड
वांद्रे मिलिटरी रोड
अंधेरी येथील एमआयडीसी रोड क्रमांक ६०
विलेपार्ले येथील श्रद्धानंद रोड येथील काम
विलेपार्ले येथील संत मुक्ताबाई मार्ग
ए विभागातील बॉम्बे हॉस्पिटल रोड