

मुंबई : यंदाच्या वर्षी १४ सप्टेंबर रोजी लाडक्या गणराचे आगमन होणार असून २५ सप्टेंबर रोजी बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. बाप्पाच्या विसर्जनापूर्वी मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील, असे आश्वासन महापौर रितू तावडे यांनी दिल्याचे बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने सांगितले.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या विविध समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या प्रतिनिधींनी महापौर रितू तावडे यांची भेट घेतली. यावेळी महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या वाढविणे, जीवरक्षकांची संख्या वाढविणे यासह विविध सुविधांबाबत चर्चा झाली. गणेशोत्सवापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन महापौरांनी समितीला दिले.
विसर्जन स्थळांवर महिलांसाठी पुरेशा स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याची मागणी समितीने यावेळी केली. गिरगाव चौपाटी, दादर, जुहू आदी प्रमुख विसर्जनस्थळांवर मंडळांच्या मागणीनुसार अतिरिक्त स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात येणार आहेत. तसेच विजेचीही आवश्यक व्यवस्था केली जाईल, असे महापौरांनी आश्वासीत केल्याचे बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अँड नरेश दहिबावकर यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांत कृत्रिम तलाव तसेच नैसर्गिक जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याने जीवरक्षकांची संख्या वाढविण्याची मागणी केली असता आवश्यकतेनुसार संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जीवरक्षकांची संख्या वाढविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. चौपाटीवरील विसर्जनावेळी मंडळांच्या ट्रॉली वाळूमध्ये रुतून मिरवणुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी मागील वर्षापेक्षा अधिक प्रमाणात स्टील प्लेट्स टाकण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.