

मुंबई : एआय गॉगल्स चष्मा घालून गुप्त रेकॉर्डिंग, छायाचित्रण करण्याचा धोका अधिक आहे. यामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पालिका मुख्यालयासह अन्य कार्यालयात एआय गॉगल्स आणि चष्म्यावर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ठाकरे सेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
एआय आधारित स्मार्ट गॉगल्स आणि चष्म्यांद्वारे गुप्तपणे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, व्हिडीओ रेकॉर्डिंग तसेच लाइव्ह स्ट्रिमिंग करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांची गोपनीयता धोक्यात येण्याबरोबरच शासकीय आणि प्रशासकीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. संवेदनशील कागदपत्रे, बैठका आणि महत्त्वाची माहिती अनधिकृतपणे बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्य शासनानेदेखील अशा उपकरणांच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांचा विचार करून त्यांच्या वापरासाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. मंत्रालय, पोलीस ठाणे आणि न्यायालय परिसराप्रमाणेच महापालिकेची कार्यालये आणि महत्त्वाची आस्थापने संवेदनशील स्वरूपाची असल्याने येथेही अशा उपकरणांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्व कार्यालये, मुख्यालय, विभागीय कार्यालये तसेच अन्य महत्त्वाच्या आस्थापनांच्या आवारात एआय आधारित स्मार्ट गॉगल्स आणि स्मार्ट चष्म्यांच्या वापरावर तातडीने आणि पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.