भूमिपूजनाच्या १० महिन्यांनंतरही इमारतीच्या उभारणीला मुहूर्त मिळेना; आश्रय योजनेंतर्गत घरांबाबत सफाई कामगारांची नाराजी

मुंबईतील फोर्ट येथे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांना आश्रय योजनेंतर्गत घरे देण्यासाठी गेल्या १० महिन्यांपूर्वी भूमिपूजन झालेल्या जागेवर महापालिकेला अद्यापही इमारत उभारणीसाठी मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे योजनेसाठी प्रस्तावित झालेल्या सुमारे १७ कोटींच्या निधीवर पाणी फिरते की काय? अशी भीती सफाई कामगारांना सतावत आहे.
mumbai-safai-kamgar-housing-delay-after-bhoomipujan
mumbai-safai-kamgar-housing-delay-after-bhoomipujan
Published on

मुंबई : मुंबईतील फोर्ट येथे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांना आश्रय योजनेंतर्गत घरे देण्यासाठी गेल्या १० महिन्यांपूर्वी भूमिपूजन झालेल्या जागेवर महापालिकेला अद्यापही इमारत उभारणीसाठी मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे योजनेसाठी प्रस्तावित झालेल्या सुमारे १७ कोटींच्या निधीवर पाणी फिरते की काय? अशी भीती सफाई कामगारांना सतावत आहे. याविषयी माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली.

ऑक्टोबर २०२४ मध्ये फोर्ट विभागाच्या कोचीन स्ट्रीट येथील सफाई कर्मचाऱ्यांसाठी आश्रय योजनेच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. अंदाजे १७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात २३८ चौरस फुटांच्या प्रत्येकी ५४ सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र १० महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप या योजनेसाठी साधा खड्डाही खोदला गेला नाही. यामुळे सफाई कामगारांमध्ये पालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात मोठा संताप निर्माण झाला आहे.

...तर न्यायालयात जावे लागेल!

मकरंद नार्वेकर म्हणाले की, आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानजनक घरे मिळणे ही बऱ्याच काळापासून न्याय्य मागणी प्रलंबित आहे. आपले शहर स्वच्छ ठेवण्याव्यतिरिक्त, इतरही स्वच्छता मोहिमेसारख्या उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत त्यांची फसवणूक झाल्याची भावना आहे. कारण प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. निवडणुकांपूर्वी मते मिळविण्यासाठी प्रकल्पांना गती मिळते, मात्र त्यानंतर पालिकेने हा प्रकल्प थंड बस्त्यात टाकला आहे. जर युद्धपातळीवर प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी त्वरित पावले उचलली गेली नाहीत, तर आम्हाला न्यायालयांसह सर्व पर्यायांचा विचार करावा लागेल, असा इशारा नार्वेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

logo
marathi.freepressjournal.in