

देवश्री भुजबळ/मुंबई
खड्डे, रस्त्यांची दुरवस्था आणि रस्ते विकासकामांमधील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात गुरुवारी नागरी हक्क कार्यकर्त्यांनी सहार रोड मेट्रो ३ स्थानकांजवळ अनोखे आंदोलन केले. प्रशासकीय दुरवस्था आणि अस्वच्छतेचे प्रतीक म्हणून आंदोलनकर्त्यांनी थेट रस्त्यांवर जिवंत झुरळे सोडून आपला तीव्र निषेध नोंदवला.
मुंबईतील खड्ड्यांची समस्या कायमस्वरूपी मिटवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सिमेंट काँक्रीटीकरणाचे मोठे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करूनही खड्ड्यांची संख्या कमी झालेली नाही, याकडे वॉचडॉग फाऊंडेशनने या आंदोलनाद्वारे लक्ष वेधले. पालिकेकडे १० जून ते १० सप्टेंबर या काळात १०, १०६ खड्ड्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात सप्टेंबरमधील ७६० तक्रारींचा समावेश असून बुधवारी ४० तक्रारींची नोंद झाली आहे.
मलमपट्टी नको, टिकाऊ रस्ते द्या!
'आमचे हे प्रतीकात्मक आंदोलन उपरोधाच्या माध्यमातून प्रशासनाचे गंभीर अपयश उघड करण्यासाठी आहे. वारंवार तक्रारी करून आणि रस्ते दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये उधळल्यानंतरही खड्ड्यांमुळे वाहनचालक, पादचारी आणि सायकलस्वारांचा जीव धोक्यात येत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये झुरळे सोडून आम्ही प्रशासनाला एकच प्रश्न विचारत आहोत - सुरक्षित प्रवासासाठी अयोग्य ठरलेल्या या रस्त्यांवर नागरिकांनी अजून किती काळ असा त्रास सहन करायचा? आम्हाला मलमपट्टी नको, तर टिकाऊ, शास्त्रोक्त आणि पारदर्शक रस्ते दुरुस्ती हवी आहे,' अशी प्रतिक्रिया 'वॉचडॉग फाऊंडेशन'चे विश्वस्त गॉडफ्री पिमेंटा यांनी दिली.