Mumbai : कंत्राटदाराची मुजोरी! साकीनाका मॅनहोलप्रकरणी पालिकेच्या कारणे दाखवा नोटिशीला केराची टोपली

साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सहाय्यक आयुक्तांसह तिघा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर या प्रकरणात कंत्राटदार दोषी आहे का, कंत्राटदारांचे काय म्हणणे हे जाणून घेण्यासाठी सात दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र सात उलटले तरी कंत्राटदाराने पालिकेच्या नोटिसीला केराची टोपली दाखवत उत्तर देणे टाळले आहे.
Mumbai : कंत्राटदाराची मुजोरी! साकीनाका मॅनहोलप्रकरणी पालिकेच्या कारणे दाखवा नोटिशीला केराची टोपली
Mumbai : कंत्राटदाराची मुजोरी! साकीनाका मॅनहोलप्रकरणी पालिकेच्या कारणे दाखवा नोटिशीला केराची टोपली संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सहाय्यक आयुक्तांसह तिघा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर या प्रकरणात कंत्राटदार दोषी आहे का, कंत्राटदारांचे काय म्हणणे हे जाणून घेण्यासाठी सात दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र सात उलटले तरी कंत्राटदाराने पालिकेच्या नोटिसीला केराची टोपली दाखवत उत्तर देणे टाळले आहे. कंत्राटदाराचे उत्तर येत नसल्याने त्यला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया रखडली आहे.

३० जून ते ६ जूनपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस बरसला.‌ आठ दिवस बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईत झाड व झाडांच्या फांद्या कोसळणे अशा दुर्घटना घडल्या. कुर्ला पश्चिम येथे मुंबई महापालिकेचे एल वॉर्ड कार्यालय आहे. एल विभाग कार्यालया अंतर्गत साकीनाका खैराणी रोड येतो. खैराणी रोडवर मलनिस्सारण प्रचालन विभागांतर्गंत एका मॅनहोलवर संरक्षक जाळी बसवण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी रस्त्यावरून अस्लम इसाक शेख हे मोबाईलवर बोलत पायी जात होते. शेख मॅनहोलजवळ आले त्यावेळी मॅनहोलजवळ कामासाठी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांना आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेख यांचा तोल जाऊन ते 'मॅनहोल'मध्ये पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एल वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांसह चौघांचे निलंबन केले आहे. निलंबनाची कारवाई करतानाच सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. मात्र अद्यापही कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आलेले नाही.

साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून शेख यांचा मृत्यू झाल्याची घटना २ जुलैला घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्याचदिवशी महापालिकेच्या एल वॉर्डकडून कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या नोटिशीला कंत्राटदाराकडून उत्तर मिळाल्यानंतर त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार होती. यासाठी कंत्राटदाराला सात दिवसांची मुदतही मिळाली. मात्र कंत्राटदाराने कारणे दाखवा नोटिशीकडे दुर्लक्ष करत अद्याप उत्तरच दिलेले नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे या आठवड्यात पुन्हा नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतरही उत्तर न मिळाल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव प्रथम महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवला जाईल आणि त्यांच्यामार्फत पुढे महापालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. यावर आयुक्तांनी अंतिम निर्णय घेतल्यानंतरच कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले जाणार आहे.

प्रत्येक मॅनहोलला संरक्षक जाळी बसवणे अशक्य!

साकीनाका येथील खैराणी रोडवर २ जुलै रोजी उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय अस्लम इसाक शेख यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबईतील उघड्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला असून मुंबई पालिकेला टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यातच प्रत्येक मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवणे अशक्य आहे, अशी कबुली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली आहे.

अहवालाची प्रतीक्षा

या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आणि महापालिका क्षेत्रात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी गठित करण्यात आली आहे. या समितीत उपायुक्त (सामान्य प्रशासन), उपायुक्त (परिमंडळ ७), उपायुक्त (पायाभूत सुविधा) सदस्य आहेत. चौकशी समिती सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होती. मात्र अद्यापही अहवाल गुलदस्त्यातच आहे. शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या पावसाळी विशेष सभेत मंगळवारपर्यंत हा अहवाल प्राप्त होणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा यांनी सांगितले होते. यातून कंत्राटदाराला कार्यादेश कोणी दिले होते, बिलाची रक्कम आदा केली का ही माहिती चौकशीतून समोर येणार असल्याचेही स्पष्ट केले होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in