
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई खात्यातील खासगीकरणाचा घाट पालिका प्रशासनाने घातला होता. याविरोधात कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिल्यानंतर पालिका आयुक्तांनी सफाई कामगारांचे एकही पद कमी केले जाणार नाही. तर कंत्राटी कामगारांना कायम केले जाणार आहे, असे आश्वासन दिले. तसेच मनपा आयुक्त भूषण गगरानी हे कामगार संघटनांबरोबर येत्या सोमवारी करार करणार असल्याची माहिती कामगार संघटनांनी दिली.
मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मंगळवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांच्यासोबत म्युनिसिपल कामगार ॲक्शन कमिटी आणि मनपा कामगार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाच्या वाटाघाटी झाल्या. या बैठकीत समाजवादी कामगार नेते कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरेश ठाकूर, विजय कुलकर्णी, अशोक जाधव, रमाकांत बने, वामन कविस्कर, मिलिंद रानडे, रंगा सातवसे, बाबा कदम, देवी गुजर, प्रकाश जाधव, शेषराव राठोड आणि प्रफुल्लता दळवी सहभागी झाले होते.
आझाद मैदान येथे १७ जुलै रोजी झालेल्या मनपा सफाई कामगारांच्या मोर्चाची आणि घोषित संपाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना आझाद मैदानात भेटीसाठी पाठवले होते. त्यानंतर विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कामगारांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निविदा प्रक्रियेचा पुनर्विचार करून कोणताही कामगार कपात होणार नाही, तसेच सर्व कंत्राटी कामगारांना नोकरीवर कायम केले जाईल, असे आश्वासन दिले होते.
पालिका प्रशासनासोबत २३ जुलैच्या आत लेखी करार करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी महापालिका आयुक्त यांनी कामगार संघटनेच्या बैठकीत कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.