

मुंबई : मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आदिवासी पाड्यांवर सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे गेल्या दोन दिवसांपासून तणाव निर्माण झाला होता. वनविभाग आणि स्थानिक आदिवासी नागरिक यांच्यात संघर्ष वाढल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अखेर वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर मंगळवारी या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
कारवाई थांबताच नॅशनल पार्क परिसरातील तणाव निवळून आदिवासींना दिलासा मिळाला आहे. बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात स्थानिक आदिवासी नागरिक आणि वनविभाग यांच्यात मागील दोन दिवसांपासून संघर्ष सुरू होता. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला असून परिसरात तणावाचे वातावरण होते. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नॅशनल पार्कच्या आतमध्ये राहणारे आदिवासी आणि पोलीस यांच्यामध्ये मोठी झटापट झाली. आदिवासींच्या बेकायदा घरांवर कारवाई करताना पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. कारवाईच्या विरोधात आदिवास समाज एकवटला होता. दरम्यान, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाल्याचीही माहिती आहे.
मात्र, ही सर्व कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होत असल्याचे संजय गांधी नॅशनल पार्क प्रशासनाकडून सांगण्यात आले. या सगळ्या गोंधळानंतर तणावाच वातावरण निर्माण झाल्याने संजय गांधी नॅशनल पार्क मंगळवारच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. संजय गांधी नॅशनल पार्कच्या बाहेर मुख्य गेटवर बॅरिगेटिंग केली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर निदर्शने
आदिवासींच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्याच्या निषेधार्थ, नॅशनल पार्कच्या क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानाबाहेर सोमवारी रात्री निदर्शने केली. राज्य आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष विवेक पंडित म्हणाले की, “२०१८ च्या पुनर्वसन योजनेची अंमलबजावणी होईपर्यंत आणि बाधित कुटुंबांचे पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडली जाऊ नयेत.” पुनर्वसन योजनेवर चर्चा केली जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर आदिवासींनी आपले आंदोलन मागे घेतले.