

मुंबई : सर्व निर्माणाधीन असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राचे कामकाज विहित कालावधीत पूर्ण करावे आणि ते तत्काळ कार्यान्वित होतील, हे सुनिश्चित करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. तसेच मालाड येथील मलजल प्रक्रिया केंद्राच्या उभारणीचे कामकाज सर्व निर्माणाधीन गतीने सुरू असून येथील प्रगती समाधानकारक आहे, असेही त्यांनी सांगितले.
समुद्रात जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी वरळी, धारावी, वांद्रे, घाटकोपर, भांडुप, वेसावे (वर्सोवा) आणि मालाड येथे मलजल प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्यात येत आहेत. या सात निर्माणाधीन प्रकल्पांची एकूण प्रक्रिया क्षमता २४६४ दशलक्ष लिटर्स प्रतिदिन इतकी आहे. कुलाबा येथे ३७ दशलक्षलिटर्स प्रतिदिन इतक्या क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र बांधून ते एप्रिल २०२० मध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे.
मालाड येथे उभारण्यात येत असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामांची पाहणी आयुक्त अश्विनी भिडे यांनी शनिवारी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व निर्देश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, स्थानिक नगरसेविका कमरजहाँ सिद्दीकी, उपायुक्त (परिमंडळ-४) डॉ. भाग्यश्री कापसे, उपायुक्त (आयुक्त यांचे कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) (प्रभारी) अशोक मेंगडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रकल्पाच्या विविध घटकांची सद्यस्थिती, कामाची प्रगती, गुणवत्तेचे निकष तसेच उर्वरित कामांचे नियोजन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली. विविध यंत्रसामग्रीची उभारणी, विद्युत यंत्रणेची उभारणी, प्रक्रिया युनिट्सची कार्यक्षमता, सुरक्षिततेच्या उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली. तसेच, प्रत्येक टप्प्यात गुणवत्तेची काटेकोर अंमलबजावणी करत नियोजित मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाने ४५४ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या मालाड मलजल प्रक्रिया केंद्राचे (जमिनीची सुधारणा करण्याच्या कामासह) रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण करण्याचे काम जुलै २०२२ पासून हाती घेतले आहे. रचना व बांधकाम कालावधी ६ वर्षे असून प्रचालन व परिरक्षण कालावधी पुढील १५ वर्षे आहे. या प्रकल्पामध्ये सिक्वेन्शियल बॅच रिअॅक्टर (एसबीआर) हे तंत्रज्ञान प्रस्तावित आहे. या मलजल प्रक्रिया प्रकल्पामध्ये, दररोज ४५४ दशलक्ष लिटर मलजलावर द्वितीय स्तरीय प्रक्रिया केली जाईल.
अडीच हजार दशलक्ष लिटर क्षमतेचे केंद्र
मालाड (४५४ दशलक्ष लिटर प्रतिदिन), वरळी (५०० द. लि.), भांडुप (२१५ द. लि.), वांद्रे (३६० द. लि.), धारावी (४१८ द. लि.), घाटकोपर (३३७ द. लि.), वर्सोवा (१८० द. लि.), कुलाबा (३७ द. लि.) अशा एकूण २ हजार ५०१ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमता असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामकाजाच्या सद्यस्थितीचा आढावा अश्विनी भिडे यांनी यावेळी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून घेतला.
सागरी जीवनात सुधारणा होणार
खारफुटी व कांदळवन काढण्यासाठी विविध परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. नवीन मलजल प्रक्रिया केंद्र सुरू झाल्यानंतर, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुधारणा होईल. तसेच दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.