

मुंबई : देशाचे हित आणि देशाची अर्थव्यवस्था सर्वश्रेष्ठ आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत मुंबईतील विशेष सेबी न्यायालयाने दोषी शेअर दलाल केतन पारेख याला मोठा दणका दिला. पारेखने ९१ दिवसांसाठी परदेशात जाण्याची परवानगी मागत अर्ज केला होता. तो अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला.
२०००-२००१ च्या शेअर बाजार घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या केतन पारेखने कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी २० डिसेंबर ते २० मार्च या कालावधीत थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, यूएई, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड या ९ देशांमध्ये जाण्याची परवानगी मागितली होती. तसेच यासाठी कोणतीही अतिरिक्त सुरक्षा ठेव न भरण्याची सूटही त्याने मागितली होती. त्याच्या अर्जावर विशेष न्यायाधीश आर. एम. जाधव यांच्यापुढे सुनावणी झाली.
आरोपीला तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीसाठी परदेश दौऱ्याची सरसकट परवानगी देणे देशाच्या हिताचे आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. इतका मोठा कालावधी दिल्यास आरोपी पुन्हा एकदा शेअर बाजाराच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर कृत्ये करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले आणि पारेखचा अर्ज फेटाळला.
सेबीतर्फे विशेष सरकारी वकील अनुभा रस्तोगी यांनी पारेखच्या अर्जाला तीव्र विरोध केला. पारेखने यापूर्वीही परदेश प्रवासाच्या सवलतीचा गैरवापर करून एका मोठ्या ग्राहकाच्या गोपनीय माहितीच्या आधारे 'फ्रंट-रनिंग' गैरव्यवहार केले आहेत, असे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्याची नोंद घेत न्यायालयाने पारेखला दणका दिला.