वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील आव्हानात्मक टप्प्यातील अडीच हजार मेट्रिक टन वजनाचा ‘बो स्ट्रिंग आर्च गर्डर’ यशस्वीपणे बसवण्यात आला.
वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच
छायाचित्र सौजन्य - विजय गोहिल

मुंबई : मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील आव्हानात्मक टप्प्यातील अडीच हजार मेट्रिक टन वजनाचा ‘बो स्ट्रिंग आर्च गर्डर’ बुधवारी पहाटे यशस्वीपणे बसवण्यात आला. विशेष म्हणजे, ३ वाजता सुरू झालेले हे काम ६ वाजून ७ मिनिटांनी संपले. याचाच अर्थ, ३ तास ७ मिनिटांत दुसरा गर्डर बसवण्याचे मिशन फत्ते झाले. समुद्रातील भरती व ओहोटीचे चॅलेंज स्वीकारत दुसरा गर्डर यशस्वीपणे बसवण्यात आल्याने अभियांत्रिकी आविष्कार घडला आहे. पहिला बो स्ट्रिंग आर्च गर्डर २६ एप्रिल रोजी बसवण्यात आला, तर दुसरा गर्डर बुधवार १५ मे रोजी बसवण्यात आल्याने पुढील दीड महिन्यांत वांद्रे ते मरीन ड्राईव्ह दरम्यानचा प्रवास फक्त १२ मिनिटांत करणे शक्य होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेच कोस्टल रोडच्या कामाची ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरुवात झाली. कोस्टल रोड प्रकल्प एकूण १०.५८ किलोमीटर लांब असून मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील अतिशय आव्हानात्मक टप्पा म्हणजे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची सांधणी. त्यासाठी पालिका प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध तयारी केली आहे. या दोन्ही टोकांना सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) बुधवार, २४ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२.३० मिनिटांनी माझगाव डॉक येथून मार्गस्थ झाली आणि गुरुवार २५ एप्रिल रोजी पहाटे चार वाजता वांद्रे-वरळी सागरी सेतूजवळ पोहोचली. शुक्रवारी पहाटे सव्वा तासांत बो स्ट्रिंग आर्च गर्डर यशस्वीपणे बसवण्यात आला. तर दुसऱ्या टप्प्यातील बो स्ट्रिंग आर्च गर्डर बुधवार १५ मे रोजी पहाटे ६ वाजून ७ मिनिटांनी बसवण्यात आला. या जोडणीमुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग एकमेकांना पूर्णपणे जोडले गेले आहेत.

पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता मांतय्या स्वामी, ‘एचसीसी’चे अध्यक्ष अजित गुलाबचंद, उपाध्यक्ष अर्जुन धवन, मोहिमेचे प्रमुख संतोष राय आदींसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते.

दुसरी तुळई वजन, लांबी-रुंदीने मोठी

मुंबई किनारी रस्त्यावर स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या तुळईपेक्षा तुलनेने दुसरी तुळई ही वजनाने, लांबी-रुंदीने मोठी आहे. दुसरी तुळई ३१.७ मीटर रुंद, ३१ मीटर उंच आणि १४३ मीटर लांब आहे, तर वजन अडीच हजार मेट्रिक टन आहे. अंबाला (हरियाणा) येथे या तुळईचे लहान सुटे भाग तयार करण्यात आले आहेत. पहिल्या तुळईपासून केवळ २.८ मीटर अंतर फरक लक्षात घेता, दुसरी तुळई स्थापन करणे आव्हानात्मक होते. न्हावा बंदरातील माझगाव गोदी केंद्रातून रविवार १२ मे २०२४ रोजी सकाळी दुसरी तुळई घेवून तराफा (बार्ज) निघाला होता.

म्हणून आत्मविश्वास वाढला

याआधी, प्रवाहकीय हवामानानुसार अंदाज घेऊन २६ एप्रिल रोजी पहिली तुळई स्थापन करण्यात आली होती. तो अनुभव गाठीशी असल्याने दुसरी तुळई स्थापन करण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या पथकाचा आत्मविश्वास दुणावला होता. बुधवारी पहाटे ३ वाजेपासून ही मोहीम सुरू करण्यात आली. प्रवाहकीय हवामानाचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने ही तुळई आधी स्थापन केलेल्या पहिल्या तुळईकडे सरकविण्यात आली. चारही बाजूचे कोन तंतोतंत जुळल्यानंतर पहाटे ६ वाजून ७ मिनिटांनी अडीच हजार मेट्रिक टन वजनाची तुळई यशस्वीपणे जोडण्यात आली.

सावधानता अन् उत्सुकता

पहिली तुळई बसवितांना आजूबाजूला मोकळी जागा असल्याने अभियंत्यांना अंदाज घेण्यासाठी पुरेसा वाव होता. परंतु बुधवारी दुसरी तुळई स्थापन करताना तितकीशी मोकळीक नव्हती. पहिल्या तुळईचा अंदाज घेत, अतिशय सावधपणे ही मोहीम पार पारण्याचे मोठे आव्हान होते. पहिल्या तुळईपासून अवघ्या २.८ मीटर अंतरावर दुसरी तुळई स्थापन करणे काहीसे जोखमीचे होते. परंतु या प्रकल्पावर काम करणारे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी आणि कामगार यांनी अतिशय कुशलतेने ही मोहीम पार पाडली. मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू दरम्यान स्थापन करण्यात आलेल्या दोन्ही तुळईवर पुढील टप्प्यात सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या तुळईला गंज चढू नये यासाठी सी-५ या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in