

मेघा कुचिक/मुंबई
२०२६ च्या पहिल्या सत्रात अमली मुंबई पोलिसांनी पदार्थांविरोधात (नारकोटिक्स) जोरदार मोहीम राबवत 'एनडीपीएस' कायद्यांतर्गत हजारो गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, पोलिसांची अधिकृत आकडेवारी पाहता, एकीकडे मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करून तस्करांना गजाआड केले जात असले, तरी शहरात अमली पदार्थांचे वाढते सेवन हे पोलिसांपुढील मोठे आव्हान ठरत आहे.
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत एनडीपीएस कायद्यान्वये ४,०१२ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी (ताबा) ५८६, तर अमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी ३,४२६ गुन्ह्यांचा समावेश आहे.
अमली पदार्थांमध्ये गांजाचे प्रमाण सर्वाधिक
जप्त केलेल्या अमली पदार्थांमध्ये वजनाच्या बाबतीत गांजाचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर बाजारभावानुसार 'एमडी' हे सर्वात महागडे ड्रग्ज ठरले आहे. केवळ सहा महिन्यांत सुमारे १४६.७ कोटी रुपये मूल्याचे एमडी जप्त करण्यात आले, जे एकूण जप्त ड्रग्जच्या जवळपास ७१ टक्के आहे.
'एएनसी'चे पथक करतेय कारवाई
ही आकडेवारी केवळ सहा महिन्यांची असली, तरी तस्करी आणि ताबा मिळवण्याच्या गुन्हह्यांपेक्षा अमली पदार्थांच्या सेवनाचे गुन्हे कितीतरी पटीने जास्त आहेत. अमली पदार्थांची मागणी रोखण्यावर पोलिसांचा मोठा भर असल्याचे दिसून येते. अमली पदार्थ विरोधी पथक (एएनसी) आणि पोलीस ठाणी गल्लीबोळातील विक्रेत्यांपासून ते संघटित तस्करांवर कारवाई करत आहेत.
कारवाईचा आढावा
वर्ष २०२५ मध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण ७,६२३ गुन्हे दाखल झाले होते. यात १,१४१ ताबा मिळवल्याचे आणि ६,४८२ सेवनाचे गुन्हे होते. या काळात ६,७७७ जणांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी ८५७.१२ कोटी रुपये मूल्याचे १,७५८.९७ किग्रॅ अमली पदार्थ, १५,९११ गोळ्या आणि १,७३७.२४ लिटर कफ सिरप जप्त केले होते.