मुंबईत साथीच्या आजारांचा ताप; तीन महिन्यांत मलेरियाचे ५,९८४ तर डेंग्यूच्या २,१६१ रुग्णांची नोंद 

यंदाच्या मान्सून सत्रात पाऊस हवा तसा बरसला नसला तरी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी मुंबईला घट्ट विळखा घातला आहे.
मुंबईत साथीच्या आजारांचा ताप; तीन महिन्यांत मलेरियाचे ५,९८४ तर डेंग्यूच्या २,१६१ रुग्णांची नोंद 
मुंबईत साथीच्या आजारांचा ताप; तीन महिन्यांत मलेरियाचे ५,९८४ तर डेंग्यूच्या २,१६१ रुग्णांची नोंद प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : यंदाच्या मान्सून सत्रात पाऊस हवा तसा बरसला नसला तरी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी मुंबईला घट्ट विळखा घातला आहे. गेल्या तीन महिन्यांत मलेरियाच्या ५,९८४, डेंग्यूचे २,१६१ तर लेप्टोच्या २७७ रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, मलेरिया डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत एडिस व अनोफिलीस डासांच्या १५ हजार १४३ उत्पत्ती स्थाने आढळली आहेत. मुंबईत २७ लाख ९३ हजार १९३ लोकांचा सर्वे केला असून ३२ हजार ११४ लोकांचे रक्ताचे नमुने तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. 

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी मुंबईत पाय रोवले आहेत. साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. मात्र जानेवारी ते सप्टेंबर २००२६ या कालावधीत मलेरिया डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो चिकुनगुनिया स्वाईन फ्लू या आजारांनी मुंबईकर त्रस्त आहेत.  मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व पालिका रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांच्या परिसरात मलेरिया व डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी नियमित सर्वेक्षण, अळीनाशक फवारणी आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा नायनाट करण्यासाठी विशेष मोहीम' प्रभावीपणे राबवली जात आहे. रुग्णालयाच्या परिसरात डासांची उत्पत्ती रोखून, तिथे येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टरांना मलेरिया व डेंग्यूसारख्या आजारांपासून वाचवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

११,३७६ एडिस डासांची उत्पत्ती स्थाने

यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत गतवर्षाच्या तुलनेत काहीशी घट झाली आहे. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्याचे मोठे आव्हान कायम आहे. पालिकेने तब्बल ४ लाख ६८ हजार ९९३ उत्पत्तीस्थाने तपासली, त्यापैकी ११ हजार ३७६ एडिस डासांची उत्पत्ती आढळली. 

सांताक्रुझ, दहिसरमध्ये लेप्टोचे अधिक रुग्ण

लेप्टोस्पायरोसिसच्या बाबतीतही महापालिकेने काही भाग धोक्याचे असल्याचे नमूद केले आहे. सांताक्रूझ वाकोला, दहिसर, मरोळ, माटुंगा, वडाळा, सायन विभागातील विविध परिसरांत लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. साचलेल्या पावसाच्या पाण्यातून विना चप्पल चालणे टाळावे आणि शक्य असल्यास गमबूट वापरावेत, असा सल्ला पालिकेने दिला आहे.

जानेवारी ते सप्टेंबर मध्ये रुग्णांची नोंद 

  • मलेरिया - ५,९८४

  • डेंग्यू - २,१६१

  • लेप्टो - २७७

  • चिकनगुनिया -५९

  • एच वन एन वन - ४८८

  • गॅस्ट्रो - २०५०

logo
marathi.freepressjournal.in