

मुंबई : मुंबई आणि महानगर प्रदेशात ऑगस्ट महिन्यात जाणवलेला पावसाचा खंड सप्टेंबरमध्येही कायम राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई तसेच शेजारील जिल्ह्यांसाठी पावसाचा कोणताही इशारा दिलेला नाही. मात्र, या काळात काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील ४८ तासांच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार, आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून अधूनमधून हलका पाऊस पडू शकतो. कमाल तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
यंदाच्या ऑगस्टमध्ये मुंबईत सरासरीपेक्षा ६६ टक्के कमी पाऊस झाल्याचे वृत्त ‘एफपीजे’ने गेल्या आठवड्यात दिले होते. एल निनोच्या हवामानविषयक परिस्थितीमुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मान्सूनच्या पहिल्या दोन महिन्यांत झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईत आतापर्यंत सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या ९६ टक्के पाऊस झाला आहे.
दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा सध्या सुमारे ९५ टक्क्यांवर आहे. रविवारी सकाळपर्यंत सातही तलावांमध्ये त्यांच्या एकूण साठवण क्षमतेच्या ९५.९७ टक्के पाणीसाठा होता. उपयुक्त पाणीसाठा १३.८९ दशलक्ष लिटर इतका होता. सातही जलाशयांची एकूण साठवण क्षमता १४.४७ दशलक्ष लिटर आहे.