मुंबईत उभी राहणार एअरपोर्ट सिटी

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडच्या उपकंपनी, ‘अदानी एअरपोर्ट सिटी लिमिटेड’ने देशातील सहा विमानतळांवर तब्बल ६५५ एकर जागेत एकात्मिक ‘एअरपोर्ट सिटी’ (विमानतळ शहरे) विकसित करण्याची घोषणा केली आहे.
मुंबईत उभी राहणार एअरपोर्ट सिटी
मुंबईत उभी राहणार एअरपोर्ट सिटी(Photo-X/@ANI)
Published on

मुंबई : अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडच्या उपकंपनी, ‘अदानी एअरपोर्ट सिटी लिमिटेड’ने देशातील सहा विमानतळांवर तब्बल ६५५ एकर जागेत एकात्मिक ‘एअरपोर्ट सिटी’ (विमानतळ शहरे) विकसित करण्याची घोषणा केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी २०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

हे प्रकल्प केवळ विमानतळाचा भाग नसून, ते शहरांशी, मेट्रोशी आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी अखंडपणे जोडले जाणार आहेत. पर्यटकांना, व्यावसायिकांना आणि स्थानिक रहिवाशांना एकाच ठिकाणी सर्व सोयीसुविधा मिळाव्यात, अशा पद्धतीने या परिसराची रचना केली जात आहे.

या उपक्रमाचा भाग म्हणून, अदानी समूहाने आयएचजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स'सोबत पाच लक्झरी हॉटेल्ससाठी करार केला आहे. याद्वारे 'किम्पटन' हा हॉस्पिटॅलिटी ब्रँड भारतात पहिल्यांदाच दाखल होत आहे. तसेच, हे सर्व प्रकल्प अमेरिकेच्या 'यू.एस. ग्रीन बिल्डिंग काउन्सिल' कडून 'लीड' गोल्ड प्री-सर्टिफिकेशन प्राप्त आहेत, जे त्यांच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक बांधकामाचे प्रतीक आहे.

७० टक्के गुंतवणूक मुंबईत

व्याप्ती : मुंबई, नवी मुंबई, अहमदाबाद, लखनऊ, जयपूर आणि गुवाहाटी अशा पाच राज्यांतील सहा विमानतळांचा यात समावेश आहे.

क्षेत्रफळ : एकूण २२ दशलक्ष चौरस फूट जागेत हा विकास होणार आहे.

मुंबईचे महत्त्व : या नियोजित गुंतवणुकीपैकी सुमारे ७० टक्के रक्कम (४४० एकर) केवळ मुंबई आणि नवी मुंबईतील प्रकल्पांसाठी खर्च केली जाणार आहे.

सुविधा : या 'एअरपोर्ट सिटी'मध्ये आलिशान हॉटेल्स, अत्याधुनिक कार्यालये, रिटेल मॉल्स, खाण्यापिण्याची ठिकाणे, मनोरंजन केंद्रे आणि कन्व्हेन्शन सेंटर्सची सुविधा असेल. हे प्रकल्प सिंगापूरचे चांगी, दुबई, ॲमस्टरडॅम आणि सोल यांसारख्या जागतिक दर्जाच्या विमानतळ शहरांच्या धर्तीवर विकसित केले जाणार आहेत.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सचे संचालक जीत अदानी म्हणाले, "जगातील यशस्वी विमानतळ शहरे ही आज वाणिज्य, पर्यटन आणि शहरी विकासाची केंद्रे बनली आहेत. भारताची विमान वाहतूक बाजारपेठ विस्तारत असताना, विमानतळांना केवळ वाहतुकीपुरते मर्यादित न ठेवता, त्यांना गुंतवणुकीचे आणि रोजगाराचे उत्प्रेरक म्हणून विकसित करण्याचा आमचा मानस आहे."

मुंबई पोर्ट ट्रस्टचाही विस्तार

मुंबई पोर्ट अथॉरिटीने आपल्या १५४ व्या स्थापना दिनानिमित्त ५,०२८.१७ कोटी रुपये खर्चाच्या ६३ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली आहे. बंदराच्या किनारी भागाचे पर्यटन आणि मनोरंजन केंद्रात रूपांतर करणार आहे. यात प्रिन्सेस डॉक येथे ४७० कोटी रुपये खर्चाचे ‘मुंबई मरीना’ उभारले जाणार आहे. हे ठिकाण नौका आणि लक्झरी जहाजांसाठी एक प्रमुख आकर्षण ठरेल. या प्रकल्पासाठी एल अँड टी सोबत करार करण्यात आला आहे. तसेच, ३.६ कोटी रुपये खर्चाच्या विशेष ‘यॉट बे’ प्रकल्पाचीही घोषणा करण्यात आली आहे. इंदिरा डॉकमधील १० बर्थचे खासगीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प जे. एम. बक्षी पोर्ट्स अँड लॉजिस्टिक यांच्या सहकार्याने राबविला जाणार असून, यामुळे पुढील १० वर्षांत बंदराला सुमारे ७७० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे मालवाहतुकीची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढण्यास मदत होईल.

logo
marathi.freepressjournal.in