
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावल्याने मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पाण्याच्या पातळीत वाढ होऊन तब्बल ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. मागील अनेक वर्षांत जून महिन्याच्या अखेरीस ५० टक्के तलाव भरल्याचे दिसून आले नाही.
मुंबईला १ ऑक्टोबरपासून वर्षभर पुरेल यासाठी १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते.
यंदा कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले. त्यामुळे पाणीप्रश्न निर्माण झाला होता. परंतु, मे महिन्यातच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तलावांतील पाणीसाठा वाढला.
दरम्यान, यंदा शुक्रवारी जमा झालेला पाणीसाठा हा मुंबईकरांना १८२ दिवस म्हणजेच १ जानेवारी २०२६ पर्यंत पुरेल इतका आहे. तर पालिका मुंबई, तलाव क्षेत्रातील गावे यांना ४०३० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा दररोज करते.
गुरुवारी सकाळी ६ ते शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत अप्पर वैतरणा तलावात ३८ मि.मी., मोडकसागर तलावात ७८ मि.मी., तानसा तलावात ५६ मि.मी., मध्य वैतरणा तलावात ७० मि.मी., भातसा तलावात ६२ मि.मी., विहार तलावात २६ मि.मी. व तुलशी तलावात ५४ मि.मी. इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
यंदा राज्यात मान्सूनचे आगमन तुलनेने लवकर झाले आहे. त्यामुळे जून महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांत चांगला पाऊस झाल्याने या सातही धरणांतील जलसाठ्यात वाढ झाली आहे.