Mumbai : मलजल बोगद्याचे ९० टक्के काम पूर्ण; जुलै २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार; पश्चिम उपनगरवासीयांना दिलासा

पश्चिम उपनगरांतील मलनिःसारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या प्राधान्य मलजल बोगदा टप्पा-१ प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा शुक्रवारी यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
Mumbai : मलजल बोगद्याचे ९० टक्के काम पूर्ण; जुलै २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार; पश्चिम उपनगरवासीयांना दिलासा
Mumbai : मलजल बोगद्याचे ९० टक्के काम पूर्ण; जुलै २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार; पश्चिम उपनगरवासीयांना दिलासासंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : पश्चिम उपनगरांतील मलनिःसारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या प्राधान्य मलजल बोगदा टप्पा-१ प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा शुक्रवारी यशस्वीरीत्या पूर्ण झाला. बोरिवलीतील डॉन बॉस्को स्कूल जंक्शन ते मालाडमधील मालवणी येथील नवीन मालाड उदंचन केंद्रादरम्यान बांधण्यात येणाऱ्या ५.८ किलोमीटर लांबीच्या भूमिगत मलजल बोगद्याचा अंतिम ‘ब्रेक-थ्रू’ करण्यात आला. या प्रकल्पाचे आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले असून, ३१ जुलै २०२७ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे.

मुंबईतील मलजलावर योग्य प्रक्रिया करून समुद्र आणि नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सुधारणे, जलप्रदूषणाला आळा घालणे आणि मलनिःसारण यंत्रणेवरील ताण कमी करणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. मुंबई मलनिःसारण प्रकल्प विभागामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

५.८ किलोमीटर लांबीचा भूमिगत बोगदा

या बोगद्याचे खोदकाम नवीन मालाड उदंचन केंद्रापासून डॉन बॉस्को स्कूल जंक्शनच्या दिशेने करण्यात आले. ‘सेगमेंटल लायनिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेल्या या बोगद्याचा अंतर्गत व्यास ३.२ मीटर असून, त्याची मलजल वाहून नेण्याची क्षमता प्रतिदिन १ हजार १८२ दशलक्ष लिटर इतकी आहे. प्रकल्पात पाच शाफ्ट, तीन ड्रॉप शाफ्ट आणि सहा स्क्रीन चेंबर्सचा समावेश आहे. डॉन बॉस्को स्कूल जंक्शन येथे अंतिम ब्रेक-थ्रू झाल्याने बोगद्याच्या बांधकामातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

चार उदंचन केंद्रांची गरज कमी होणार

गोराई, शिंपोली, चारकोप आणि मालाड या चार उदंचन केंद्रांकडे येणारे मलजल या बोगद्याद्वारे समाविष्ट केले जाणार आहे. त्यामुळे या केंद्रांची आवश्यकता उरणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. परिणामी, उदंचन केंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीवरील खर्चात मोठी बचत होण्यास मदत होईल. तसेच मलजलाचे अधिक कार्यक्षम व्यवस्थापन होऊन पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे. प्रकल्पाचे उर्वरित काम निर्धारित वेळेत पूर्ण करून जुलै २०२७ पर्यंत ही मलजल वाहून नेण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

सहा परिसरांना मोठा दिलासा

दहिसर, बोरिवली, गोराई, चारकोप, मालाड आणि कांदिवली या पश्चिम उपनगरांतील विद्यमान मलनिःसारण वाहिन्यांची क्षमता वाढत्या मलजलाच्या तुलनेत अपुरी पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहिन्यांवर अतिरिक्त ताण येऊन त्या अधिभारित स्थितीत राहतात. नवीन मलजल बोगद्यामुळे दहिसर, बोरिवली, गोराई, शिंपोली आणि चारकोप परिसरातील मलजल वाहून नेण्याची क्षमता प्रतिदिन १ हजार १३६ दशलक्ष लिटरपर्यंत वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी, जुन्या मलवाहिन्यांवरील ताण कमी होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in