आता प्रत्येक वॉर्डात अधिकृत कबुतरखाना! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नवीन कबुतरखाना

दादर कबुतरखाना बंद करण्याच्या वादानंतर आता बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कात नवीन कबुतरखान्याचे उद्घाटन रविवारी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. आदिनाथ दिगंबर जैन मंदिरातर्फे ‘तीन मूर्ती पोदनपूर’ येथे उभारण्यात आलेल्या या कबुतरखान्यामुळे पक्षीप्रेमी आणि जैन समाजाने समाधान व्यक्त केले आहे.
आता प्रत्येक वॉर्डात अधिकृत कबुतरखाना! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नवीन कबुतरखाना
Photo : X (@MPLodha)
Published on

मुंबई : दादर कबुतरखाना बंद करण्याच्या वादानंतर आता बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कात नवीन कबुतरखान्याचे उद्घाटन रविवारी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. आदिनाथ दिगंबर जैन मंदिरातर्फे ‘तीन मूर्ती पोदनपूर’ येथे उभारण्यात आलेल्या या कबुतरखान्यामुळे पक्षीप्रेमी आणि जैन समाजाने समाधान व्यक्त केले आहे. लोढा यांनी यापुढे प्रत्येक वॉर्डात अधिकृत कबुतरखाना सुरू करण्याचा विचार व्यक्त केला. यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही तसेच कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांमुळे शहरात कबुतरखान्यांना विरोध वाढला असून प्रकरण न्यायालयात गेले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सध्या दादर कबुतरखाना बंद आहे आणि नियंत्रित पद्धतीने खाद्य घालण्याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत.

पालिकेकडे ३०० सूचना आणि हरकती

मुंबई महापालिकेने आता कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य घालण्याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्यानंतर पालिकेकडे जवळपास ३०० सूचना-हरकती प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिकेने कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केल्यानंतर काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर १३ ऑगस्टला झालेल्या सुनावणीच्या वेळी कबुतरांना खाद्य घालण्यावरील बंदीचा मुंबई महापालिकेचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला. मात्र दादर येथील कबुतरखान्याजवळ कबुतरांना दररोज सकाळी सहा ते आठ या कालावधीत खाद्य देण्याच्या मागणीचा विचार सुरू असल्याची माहिती महापालिकेने उच्च न्यायालयात दिली.

logo
marathi.freepressjournal.in