

मुंबई : श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या विस्तारीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या प्रभादेवीतील भूखंडाची १०.९४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मालक आणि जुने भाडेकरू ‘सदानंद गॅरेज’ यांच्यात समान (५०-५० टक्के) वाटून देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.
या संपादित संपत्तीत दोघांचेही मोठे हितसंबंध होते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी १९ सप्टेंबर २००२ रोजी या ६४२.९८ चौ. मीटर भूखंडाचे बाजारमूल्य १,७०,२०० रुपये प्रति चौ. मीटर निश्चित केले.
मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांसाठी प्रतीक्षा कक्ष (वेटिंग हॉल) आणि विश्रामगृह बांधण्यासाठी राज्य सरकारतर्फे ही जमीन संपादित करण्यात आली होती.
एकूण १०.९४ कोटी रुपयांच्या भूखंडाच्या नुकसानभरपाईमधून प्रत्येकी ५.४७ कोटी रुपये जमीन मालक आणि सदानंद गॅरेज यांना देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच विद्यमान बांधकाम आणि झाडांसाठी दिलेली अतिरिक्त ३.८५ लाख रुपयांची रक्कम संपूर्णपणे मालकांना मिळेल.
गॅरेज १९७१ पासून संपूर्ण मालमत्तेवर ताबा सांगत असल्याचा दावा करत नुकसानभरपाईतील ७५ टक्के हिस्स्याची मागणी केली होती, तर मालकांनी संपूर्ण नुकसानभरपाईवर दावा सांगितला होता. यावरून हा वाद निर्माण झाला होता.
दोघांचेही दावे फेटाळून लावत न्यायालयाने स्पष्ट केले की, गॅरेजने आपले दीर्घकाळचे भाडेपट्टे आणि ताबा अधिकार सिद्ध केले आहेत, परंतु संपूर्ण भूखंडावर अनन्य भाडेपट्टा किंवा मालकी हक्क सिद्ध करण्यात ते अपयशी ठरले आहेत. दुसरीकडे, जमिनीवर गॅरेजचे कायदेशीर ताबा हक्क प्रस्थापित असल्याने मालकही संपूर्ण रकमेवर दावा सांगू शकत नाहीत.