

मुंबई : मतदार याद्यांमधील कथित फेरफाराविरोधात आणि आंदोलकांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारीही शिवाजी पार्क येथे ‘मूक’ आंदोलन करण्यात आले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.
या आंदोलनात सुमारे ६०० पक्ष कार्यकर्ते सहभागी झाले होते, ज्यांनी काळे कपडे, मुखवटे आणि हातात तिरंगा ध्वज घेत आपल्या मागण्यांचे फलक झळकावले.
शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शिवाजी पार्कवर उपस्थिती लावली.
या सर्व नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेत नोंदणी रजिस्टरवर स्वाक्षऱ्या केल्या.