

मुंबई : ३० सप्टेंबरपर्यंत सायन पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र पुलाचे काम सुरू असून आता १५ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सायन रेल्वे स्थानकाजवळील ११२ वर्षे जुन्या आणि असुरक्षित ठरलेल्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग आला आहे. पुलाचे सर्व काम १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांसाठी आवश्यक जागा उपलब्ध व्हावी, तसेच जुना पूल असुरक्षित झाल्याने सायन येथील रेल्वे पुलाची पुनर्बांधणी हाती घेण्यात आली आहे.
खांब नसलेला सिंगल स्पॅन पूल!
पुलाच्या पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग ते संत रोहिदास मार्ग (धारावी) या पोहोच रस्त्याचे पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्वेकडील जागेचा काही भाग मध्य रेल्वेने २५ ऑगस्टपासून पालिकेला हस्तांतरित केला असून, त्या ठिकाणी पोहोच रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासोबतच इतर सिमेंट काँक्रीटची कामेही वेगाने सुरू आहेत.
नवीन उड्डाणपुलाची लांबी ५४.५ मीटर असून त्याची रुंदी २९ मीटर आहे. पुलाखाली कोणतेही खांब नसलेला हा सिंगल स्पॅन पूल असल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांसाठी आवश्यक जागा उपलब्ध होणार आहे.
वाहतूककोंडी कमी होणार!
पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर सायन, धारावी, कुर्ला तसेच लालबहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. मध्य रेल्वेच्या समन्वयाने कामाला प्राधान्य देऊन ते निर्धारित मुदतीपूर्वी पूर्ण करण्यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.