

मुंबई : सायन पुलाचे काम पूर्णत्वास आले असून सप्टेंबर अखेरपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. तरी फेब्रुवारी २०२७ पर्यंत प्रकल्पाची मुदत असली तरी वाहनचालक व नागरिकांसाठी लवकरात लवकर खुला करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन महापौर रितू तावडे यांनी केले. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंना हिरवळ किंवा व्हर्टिकल गार्डन यांसारखे पर्याय तपासून पहावेत, असे निर्देश महापौरांनी दिले.
मध्य रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या सायन स्थानकाजवळील ११२ वर्षे जुन्या रेल्वेवरील पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पाहणी केली. यावेळी एफ दक्षिण व एफ उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष मानसी सातमकर, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मध्य रेल्वेमार्फत मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी-२) अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान पाचवी व सहावी अतिरिक्त रेल्वे मार्गिका टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी शीव स्थानकाजवळील ११२ वर्षे जुना व असुरक्षित ठरलेला पूल पुनर्बांधणीसाठी घेण्यात आला आहे. रेल्वे हद्दीतील मुख्य पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वे विभागामार्फत, तर महानगरपालिका हद्दीतील पोहोचमार्गाचे नूतनीकरण व मजबुतीकरणाचे काम रेल्वे विभागाच्या समन्वयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात येत आहे. सदर प्रकल्पाचा खर्च रेल्वे विभागाच्या निधीतून केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
वाहतूक पोलीस विभागाच्या ना-हरकत परवानगीनुसार १ ऑगस्ट २०२४ पासून अस्तित्वातील पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. स्थानिक नागरिकांच्या सोयीचा विचार करून काम दोन टप्प्यांत हाती घेण्यात आले.
पोहोचमार्गाच्या पुनर्बांधणीचे काम प्रगतिपथावर
महापालिकेमार्फत पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग ते संत रोहिदास मार्ग (धारावी) दरम्यान पोहोचमार्गाच्या पुनर्बांधणीचे काम प्रगतिपथावर आहे. पादचाऱ्यांच्या सोयीसाठी लाल बहादूर शास्त्री मार्ग येथे नवीन भुयारी मार्ग बांधून तो २० फेब्रुवारी २०२६ रोजी खुला करण्यात आला आहे.