

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयापैकी सायन रुग्णालयातील पाच मजली इमारतीच्या ओपीडीमधील एसीमध्ये स्फोट होऊन आग लागली. काही वेळात आग पसरली आणि धुराचे लोट पसरले. यावेळी ओपीडीत असलेले बाह्यरुग्णांना बाहेर काढण्यात आले. एसीमध्ये बिघाड होऊन आग लागल्याचा अंदाज असून अग्निशमन दलाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी दिली.
सायन रुग्णालयाच्या मुख्य बाह्यरुग्ण कक्षाच्या शेजारी असलेल्या रेडिओलॉजी विभागातील एसीमध्ये मंगळवारी सकाळी ११.५७ च्या सुमारास स्फोट होऊन आग लागली. स्फोट होताच रेडिओलॉजी विभागातील रुग्णांना तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.
रुग्ण सुरक्षित
सायन रुग्णालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक ७ च्या समोर असलेल्या मुख्य बाह्यरुग्ण विभागाच्या शेजारच्या इमारतीच्या तळमजल्यावर रेडिओलॉजी विभाग आहे. या विभागातील सर्वात शेवटच्या एका खोलीतील वातानुकूलित यंत्रणेत सकाळी ११.५७ च्या सुमाराला स्फोट झाला. या स्फोटानंतर त्या खोलीमध्ये आग लागली आणि इमारतीत धुराचे लोट पसरले. विभागातील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत रुग्णांना बाहेर काढले.