Mumbai : सायन, विद्याविहार, GMLR पूल सेवेत; वाहतूककोंडी फुटली, सायन पुलाच्या पुनर्बांधणीमुळे रेल्वेच्या पाचव्या, सहाव्या मार्गिकेचा मार्ग मोकळा

'गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपुलामुळे पूर्व व पश्चिमेचा थेट प्रवास करणे शक्य झाले आहे, तर सायन पुलाची पुनर्बांधणी केल्याने आता धारावी, चेंबूर, दक्षिण मुंबईचा प्रवास सुखकर झाला आहे.
Mumbai : सायन, विद्याविहार, GMLR पूल सेवेत; वाहतूककोंडी फुटली, सायन पुलाच्या पुनर्बांधणीमुळे रेल्वेच्या पाचव्या, सहाव्या मार्गिकेचा मार्ग मोकळा
Mumbai : सायन, विद्याविहार, GMLR पूल सेवेत; वाहतूककोंडी फुटली, सायन पुलाच्या पुनर्बांधणीमुळे रेल्वेच्या पाचव्या, सहाव्या मार्गिकेचा मार्ग मोकळा
Published on: 

मुंबई : ‘गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपुलामुळे पूर्व व पश्चिमेचा थेट प्रवास करणे शक्य झाले आहे, तर सायन पुलाची पुनर्बांधणी केल्याने आता धारावी, चेंबूर, दक्षिण मुंबईचा प्रवास सुखकर झाला आहे. सायन पुलाच्या पुनर्बांधणीमुळे रेल्वेच्या पाचव्या व सहाव्या मार्गिकेचा मार्ग मोकळा झाला आहे, तर विद्याविहार उड्डाणपुलामुळे पूर्व व पश्चिमेचा प्रवास सुखकर झाला आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सायन, विद्याविहार व गोरेगाव- मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाले.

‘महानगराच्‍या विकासासाठी महापालिकेने हाती घेतलेले अनेक प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आले आहेत. या प्रकल्पांची गती कायम ठेवणे, त्यांच्यातील अडथळे दूर करणे आणि सर्व संबंधित यंत्रणांमध्ये योग्य समन्वय राखणे, या गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पायाभूत सुविधांच्या विकासाचा खरा अर्थ म्हणजे ‘इझ ऑफ लिव्हिंग’ अर्थात मुंबईकरांचे जीवन अधिक सोपे, सुलभ आणि सुखकर करणे हा होय. त्यामुळे बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेले सर्व पायाभूत सुविधा प्रकल्प ठरलेल्या वेळेत आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता पूर्ण करावेत, असे निर्देश देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’ येथे झालेल्या कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून या तीन उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह विविध मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सहभागी झाले होते.

मुंबई, आर्थिक विकासाचे इंजिन...

मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नसून देशाच्या आर्थिक विकासाचे महत्त्वाचे इंजिन आहे. त्यामुळे शहराचा विकास करताना केवळ सध्याच्या गरजांचा विचार न करता पुढील २५ ते ५० वर्षांचे नियोजन डोळ्यांसमोर ठेवून पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे. काँक्रीटचे रस्ते, कोस्टल रोड, उड्डाणपूल आणि बोगदे हे स्वतंत्र प्रकल्प नसून, एकमेकांना जोडणाऱ्या व्यापक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा - आयुक्त

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या तीन पुलांमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा आणि गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. वाढती वाहतूक, कोंडी आणि प्रवासासाठी लागणारा वेळ या समस्या कमी करण्यासाठी रस्ते, पूल आणि अन्य वाहतूकविषयक पायाभूत सुविधांचा नियोजनबद्ध विकास करण्यात येत आहे. या सुविधा मुंबईच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे योगदान देतील, असे त्यांनी सांगितले.

सायन पुलामुळे धारावी, चेंबूर, वांद्रे, कुर्लावासियांना दिलासा

मध्य रेल्वेच्या हद्दीतील सायन उड्डाणपूल ११० वर्षे जुना झाला होता. त्यामुळे या पुलाची पुनर्बांधणी गरजेची होती. मध्य रेल्वे व मुंबई महापालिकेने समन्वय साधून उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले. सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने धारावी, चेंबूर, कुर्ला वासियांसह मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्याविहार उड्डाण पूल गुरुवारपासून वाहतुकीसाठी खुला झाला. या पुलामुळे विद्याविहार पूर्व व पश्चिमेचा प्रवास सुखकर झाला आहे.

‘जीएमएलआर’मुळे वाहतूक कोंडी फुटली

गोरेगाव - मुलुंड लिंक रोडवरील रत्नाकर हॉटेल परिसरातील वाहतूक कोंडी फुटली आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

शीवचा पूल चार महिने आधी पूर्ण

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी तीन उड्डाणपूल म्हणजे केवळ सिमेंट आणि लोखंडाच्या रचना नसून मुंबईकरांचा मौल्यवान वेळ वाचवणारे विश्वासाचे सेतू असल्याचे सांगितले. शीव येथील ११२ वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल सुरक्षेच्या कारणास्तव बंद करावा लागल्यानंतर नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र, मध्य रेल्वे आणि महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी समन्वयाने काम करून हा पूल नियोजित वेळेच्या चार महिने आधी पूर्ण केला, असे त्यांनी नमूद केले. विद्याविहार परिसरात एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूर्वी सुमारे अर्धा तास लागत होता. नव्या पुलामुळे हा प्रवास अवघ्या १० मिनिटांवर येण्यास मदत होईल, असा दावा महापौरांनी केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in