
स्वीटी भागवत/मुंबई
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून ते आंतरराष्ट्रीय शहर आहे. हे शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) प्रयत्न करत आहे. आता शहरातील झोपडपट्ट्यांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी एसआरएने कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) मदत घेण्याचे ठरवले आहे. नवी अतिक्रमणे रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात येत असल्याची माहिती एसआरएच्या एका अधिकाऱ्याने दिली.
मुंबईत ४० लाखांहून अधिक झोपड्या आहेत. या झोपडपट्ट्या हटवून झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे देण्यासाठी सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवायला सुरुवात केली. त्यातून हजारो कुटुंबीयांना मोफत पक्की घरे मिळाली. त्यामुळे नवनवीन झोपड्या तयार होताना दिसत आहेत. त्याला आळा घालण्याची डोकेदुखी वाढू लागली आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय एसआरएने घेतला आहे.
एसआरए दर सहा महिन्यांनी शहरातील अस्तित्वात असलेल्या झोपडपट्ट्यांचे फोटो आणि व्हिडीओ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून गोळा करणार आहे. यामुळे एखाद्या भागात नव्याने निर्माण झालेली झोपडपट्टी तत्काळ ओळखता येणार आहे. अशी झोपडपट्टी आढळल्यास लगेच कारवाई करण्यात येणार आहे.
मालवणी भागात याबाबतचा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आला होता. त्यानंतर एसआरएने हे तंत्रज्ञान संपूर्ण मुंबईभर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष विभाग स्थापन केला जाणार असून, नव्या झोपडपट्ट्यांवर त्वरित कारवाई केली जाईल.
या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नव्या झोपडपट्ट्या तयार होण्यापूर्वीच त्यांना रोखणे आणि सुरू असलेल्या पुनर्वसन प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण होऊ न देणे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याचे स्वप्न साकार करण्याची अपेक्षा एसआरएने व्यक्त केली आहे.