

मुंबई : मुंबईत वाहन पार्किंगसाठी घर बसल्या जागा आरक्षित करता यावी, यासाठी मोबाईल अॅप विकसित करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून मोबाईल अॅप विकसित करणे शक्य झालेले नाही. मोबाईल अॅप विकसित करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली मात्र कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून हार्डवेअर व सॉफ्टवेअर एकच निविदा मागवण्यात येणार आहे. पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया रावबणे म्हणजे आणखी काही महिने या मोबाईल अॅपची प्रतीक्षाच मुंबईकरांना करावी लागणार आहे.
मुंबईत दररोज शेकडो नवीन वाहने रस्त्यावर येत असतात. त्यामुळे मुंबईत चारचाकी दुचाकी वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. सद्यस्थितीत मुंबईत ५४ लाख चारचाकी तीन चाकी वाहने असून ३१ लाख दुचाकी वाहने आहेत. वाहनांची वाढती संख्या, रस्त्यांच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग यामुळे मुंबईत पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने मोबाईल अॅप विकसित करण्यासाठी पाच ते सहा वर्षांपूर्वी निविदा प्रक्रिया राबवली. मात्र सहा वर्षांपासून मोबाईल अॅप विकसित करण्यासाठी तंज कंपन्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता हार्डवेअर व सॉफ्टवेअर अशी एकच निविदा मागवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या आधी दोन्ही निविदा वेगवेगळ्या काढत असल्याने हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, आता आता एकच निविदा मागवण्यात आली असून लवकरच मोबाईल अॅप विकसित करण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
गाड्यांची संख्या वाढल्यामुळे पार्किंगसाठी जागा कमी
सध्या मुंबईत ९८ रस्त्यांवरील वाहनतळाची सुविधा असून ३५ पब्लिक पार्किंग लॉट आहेत, तर बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळ येणार असून त्यावर काम सुरू आहे, तर पार्किंगसाठी आणखी काही जागांचा शोध घेण्यात आला आहे. आता मोबाईल अॅप विकसित झाल्यानंतर मुंबईकरांना घरबसल्या पार्किंगसाठी जागा आरक्षित करणे शक्य होणार आहे.
या ठिकाणी पार्किंगची सुविधा मिळणार
मुंबईत वाहन पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी आता खासगी सोसायट्या, म्हाडा, सरकारी कार्यालयात जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. कुठल्या भागात पार्किंगची जागा उपलब्ध आहे, हे वाहनधारक घरबसल्या पार्किंगची जागा बुक करू शकणार आहे. यासाठी मुंबई महापालिका अॅप विकसित करत नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.