‘बो आर्च गर्डर’ : कोस्टल रोड ते वरळी सी-लिंक थेट प्रवास; समुद्रात देशातील सर्वात मोठा गर्डर लाँच करणार

कोस्टल रोडवरून थेट वरळी सी-लिंकवर प्रवास करता यावा, यासाठी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.
 ‘बो आर्च गर्डर’ : कोस्टल रोड ते वरळी सी-लिंक थेट प्रवास; समुद्रात देशातील सर्वात मोठा गर्डर लाँच करणार

गिरीश चित्रे/मुंबई

कोस्टल रोडवरून थेट वरळी सी-लिंकवर प्रवास करता यावा, यासाठी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. वरळी सी-लिंकला जोडण्यासाठी पिलर ७ आणि ९ च्या मध्ये देशातील सर्वात मोठा ३० बोईंग जेट वजनाइतका अडीच हजार टनाचा ‘बो आर्च गर्डर’ येत्या काही दिवसांत लाँच करण्यात येणार आहे. उलवे येथून समुद्रामार्गे अडीच हजार टन वजनाचा ‘बो आर्च गर्डर’ आणण्यात येणार असून हा गर्डर लाँच करणे कोस्टल रोड प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक टप्पा असणार आहे. अरबी समुद्रात भरती व ओहोटीचा ताळमेळ राखत हा गर्डर लाँच करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी विश्वातील हा सर्वात मोठा आविष्कार ठरणार आहे. ‘बो आर्च गर्डर’ला जपानी तंत्रज्ञानाने कोटिंग केल्याने पुढील २५ ते ३० वर्षे गंज पकडणार नाही. तसेच हा गर्डर पुढील १०० वर्षे टिकेल इतका मजबूत असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रियदर्शनी पार्क ते वरळीदरम्यान कोस्टल रोड मे अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी वेगाने काम सुरू आहे. कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यासाठी अडीच हजार टन वजनाचा देशातील सर्वाधिक वजनाचा हा गर्डर बसवण्यात येणार आहे. यामुळे १२० मीटरचे अंतर जोडले जाणार असून दक्षिणेकडील बाजूच्या चार लेन सज्ज होतील. ‘बो आर्च गर्डर’ उलवे येथून समुद्रामार्गे आणण्यात येणार आहे. परंतु पिलरवर गर्डर लाँच करताना समुद्रातील भरती व ओहोटीदरम्यान आव्हानात्मक काम असणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

असा आहे ‘बो आर्च गर्डर’

-जपानी कोटिंगनंतर २५ ते ३० वर्षे गंज पकडणार नाही

-पुलाचे आयुष्य १०० वर्षे

-पिलर टू पिलर १२० मीटर लांब

-मजबूत व टिकाऊ

भरती, ओहोटीत आव्हानात्मक काम

‘बो आर्च गर्डर’ उलवे येथून समुद्रामार्गे आणण्यात येणार आहे. परंतु पिलरवर गर्डर लाँच करताना समुद्रातील भरती व ओहोटीदरम्यान आव्हानात्मक काम असणार आहे.

अशा सुविधाही मिळणार

-भूमिगत पार्किंगमध्ये अमरसन्स येथे २५६, महालक्ष्मी मंदिर व हाजी अली १,२०० तर वरळी सी फेस येथे ४०० वाहन क्षमतेची पार्किंग सुविधा असेल. या मार्गावर वेगमर्यादा ताशी ८० ते १०० किमी असेल.

-प्रकल्पात बांधण्यात आलेले बोगदे ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग’ तंत्रज्ञानाने बनवण्यात आले असून स्वयंचलित पद्धतीने सुरक्षा यंत्रणेशी जोडले जातील. त्यामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास प्रवासी आणि वाहने सुरक्षितरीत्या बाहेर काढता येणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in