Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

मेट्रो मार्गिका ९ टप्पा-१ तसेच विद्यमान मेट्रो नेटवर्कशी सुरळीत एकात्मिकरण करण्यासाठी महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) तर्फे आवश्यक सिग्नलिंग आणि मेट्रो गाड्यांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.
Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार
Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणारसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मेट्रो मार्गिका ९ टप्पा-१ तसेच विद्यमान मेट्रो नेटवर्कशी सुरळीत एकात्मिकरण करण्यासाठी महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) तर्फे आवश्यक सिग्नलिंग आणि मेट्रो गाड्यांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचण्यांसाठी १५ ते २५ सप्टेंबर या कालावधीत विशेष सकाळचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत मेट्रो मार्गिका २अ, ७ आणि मार्गिका ९ टप्पा १ वरील प्रवासी सेवा सकाळी ६:३० वाजता सुरू होणार आहेत.

या विशेष ब्लॉकमुळे तांत्रिक पथकांना प्रवासी सेवा सुरू नसलेल्या कालावधीत सिग्नलिंग सॉफ्टवेअरचे मायग्रेशन, चाचणी आणि प्रमाणीकरण सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक सलग वेळ उपलब्ध होईल. त्याचवेळी प्रवासी सेवांवरील परिणाम केवळ सकाळच्या मर्यादित कालावधीपुरता ठेवला आहे. मेट्रो मार्गिका ९ टप्पा २ च्या वेग चाचण्यांसाठी आवश्यक सिग्नलिंग सॉफ्टवेअर आता उपलब्ध झाले आहे. त्यामुळे चाचणी आणि कार्यान्वयन प्रक्रियेतील पुढील महत्त्वाचा टप्पा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मार्गिका ९ टप्पा-२ चे कार्यरत मेट्रो मार्गिका २अ, ७ आणि मार्गिका ९ टप्पा-१ शी सुरळीत एकात्मिकरण करण्यात येणार असल्याने, नवीन टप्प्यावरील सिग्नलिंग प्रणालीची विद्यमान कार्यरत नेटवर्कसोबत चाचणी आणि प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत चारकोप डेपो येथील ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (ओसीसी) मार्फत सिग्नलिंग सॉफ्टवेअरचे नियंत्रित मायग्रेशन आणि चाचणी करण्यात येणार आहे. विद्यमान मार्गिकांवर नियमित वेळेत प्रवासी सेवा सुरू असल्याने, अशा महत्त्वपूर्ण तांत्रिक चाचण्या केवळ प्रवासी सेवा बंद असलेल्या नियंत्रित कालावधीतच करता येतात.

त्यामुळे निर्धारित सुरक्षा आणि परिचालन मानकांनुसार एकात्मिकरण चाचण्या पूर्ण करण्यासाठी हा विशेष सकाळचा ब्लॉक आवश्यक आहे. प्रवाशांनी १५ ते २५ सप्टेंबर या कालावधीत मेट्रो मार्गिका २अ, ७ आणि मार्गिका ९ टप्पा १ वरील प्रवासी सेवा सकाळी ६:३० वाजता सुरू होतील, याची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन 'एमएमएमओसीएल'ने केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in