

मुंबई : मुंबईतील राजभवनात (आताचे लोकभवन) सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसआरपीएफच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची गंभीर घटना घडली आहे.
कोल्हापूरच्या एसआरपीएफ गट क्रमांक १६ मध्ये कार्यरत असलेले कौस्तुभ सांगळे गेल्या काही दिवसांपासून राजभवनात बंदोबस्तासाठी तैनात होते. मात्र सोमवारी रात्री त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. यानंतर पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून घटनास्थळी सुसाइड नोट आढळून आली आहे. प्रेमसंबंधामुळे नैराश्येत असल्याच्या कारणावरून कौस्तुभने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासावरून समोर आले आहे.
सांगळे सोमवारी राजभवनाच्या टॉवर क्र. २ वर सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत बंदोबस्तावर तैनात होते. दर तीन तासांनी एसआरपीएफच्या जवानांची शिफ्ट बदलते. सांगळे यांची ९ वाजता ड्युटी संपल्यानंतर ते त्यांच्या खोलीत परतले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.