
मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण करणारी घटना सोमवारी घडली. कल्याण–कर्जत मार्गावर काही दुष्कृत्य करणाऱ्यांनी (ज्यामध्ये अल्पवयीनांचा समावेश असल्याचा संशय आहे) दोन एक्स्प्रेस गाड्यांवर दगडफेक केली. पहिले अंबरनाथ स्थानकाजवळ कोयना एक्स्प्रेसवर दगडफेक झाली, तर दुसऱ्या घटनेत साईनगर शिर्डी एक्स्प्रेसवर वांगणीजवळ दगडफेक झाली.
अंबरनाथजवळ साईनगर शिर्डी एक्स्प्रेसवर दगडफेक
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की मुंबईकडे येणारी साईनगर शिर्डी एक्स्प्रेस जेव्हा अंबरनाथ स्थानकाजवळ पोहोचली, तेव्हा एस१ कोचवर दगडफेक करण्यात आली, ज्यामुळे खिडकीची काच फुटली. गाडी दादर स्थानकात पोहोचल्यावर बदलापूर रेल्वे संरक्षण दलाला (RPF) माहिती देण्यात आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
कोयना एक्स्प्रेसवर दगडफेक, प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत
मुंबईच्या दिशेने अर्थात सीएमएमटीकडे जाणाऱ्या कोयना एक्स्प्रेसवरही सकाळी अंदाजे १०:३० वाजता वांगणीजवळ दगडफेक करण्यात आली. त्यामुळे एका प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली, पुढील स्थानकावर त्याला तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले.
संशयितांना शोधण्यासाठी दोन विशेष आरपीएफ पथके
"संशयितांना शोधण्यासाठी दोन विशेष आरपीएफ पथके तयार करण्यात आली आहेत", असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी सांगितले.
दगडफेकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ
मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गांवर दगडफेकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली असून, त्यामुळे रोजच्या प्रवाशांमध्ये चिंता वाढली आहे. भारतीय रेल्वेने खिडक्यांवर लोखंडी जाळ्या बसविणे यांसारख्या अनेक सुरक्षा उपाययोजना केल्या असल्या, तरीही ही समस्या कायम आहे. गेल्या महिन्यातच, हार्बर लाईनवर दगडफेकीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिला जखमी झाल्या होत्या. २६ सप्टेंबर रोजी २८ वर्षीय शिवानी हिच्या डोक्याला दगड लागून इजा झाली. ती सीएमएमटी–गोरगाव स्लो लोकलने प्रवास करत होती आणि रे रोड स्थानकाजवळ घटना घडली. त्याआधी, १८ सप्टेंबर रोजी ३९ वर्षीय अनुराधा हिला वडाळा स्थानकाजवळ डोळ्याला इजा झाली, तर १५ सप्टेंबर रोजी २१ वर्षीय महिलेला कॉटन ग्रीन आणि रे रोड स्थानकांच्या दरम्यान दगड लागला होता.
दरवर्षी सुमारे ३० प्रकरणांची नोंद
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुंबई विभागात दरवर्षी सुमारे ३० दगडफेकीच्या घटनांची नोंद होते. तर, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात अशा घटना तुलनेने कमी आहेत. पश्चिम रेल्वेवर माहीम, वांद्रे, कांदिवली आणि विरारपलीकडील भागांत अशा घटना घडल्याचे आढळते. हार्बर लाईनवर डॉकयार्ड रोड आणि मानखुर्द यांच्या दरम्यान, तर मुख्य मार्गावर कलवा, मुंब्रा, दिवा आणि कल्याणपलीकडील भागांमध्ये वारंवार दगडफेक होत असल्याचे नोंदवले गेले आहे.