शिवसेनेला नाल्यातील गाळाच्या घोटाळ्यात अडकवण्याची रणनीती

नालेसफाईच्या कामावरून शिवसेना विरुद्ध भाजप चिखलफेक सुरू आहे. विरोधक सावध भूमिकेत, प्रशासकीय कारभार कासवगतीने सुरू, त्यामुळे पावसाळ्यात ‘डुबती मुंबई को किसका सहारा’ हे काही दिवसांत स्पष्ट होईलच.
शिवसेनेला नाल्यातील गाळाच्या घोटाळ्यात अडकवण्याची रणनीती

मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या तरी मतदारराजापर्यंत पोहोचण्यासाठी नाले उत्तम साधन झाले आहे. पावसाळा जवळ आला की, नालेसफाई झाली नाही, अशी ओरड करत मुंबई महापालिकेत सत्तेचा उपभोग घेणारी शिवसेना प्रशासनावर खापर फोडते. तर प्रशासनावर सत्ताधारी पक्षाचा अंकुश नाही, असा आरोप करत विरोधक आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करतात. हे दर पावसाळ्यातील चित्र असले तरी यंदाचे चित्र थोडे वेगळे आहे. ऐकेकाळचा शिवसेनेचा मित्र पक्ष भाजपच शिवसेनेला नाल्यातील गाळाच्या घोटाळ्यात अडकवण्याची रणनीती आखत आहे. त्यात मुंबई महापालिकेवर प्रशासकीय राज्य आल्याने नालेसफाईच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार का, हे जून महिन्याच्या पहिल्या पावसातच स्पष्ट होईल.

मुंबई तुंबल्यास जबाबदार कोण?

गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाचे चटके सहन करणाऱ्या मुंबईकरांना वरुणराजा कधी बरसतो याचे वेध लागले आहेत. तर याहीपेक्षा म्हणजे यंदाच्या पावसाळ्यात शहर जलमय होणार का, या धास्तीने मुंबईकर चिंतेत आहेत. तसेच, यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी नालेसफाईची कामे उशिरा का होईना वेगाने सुरू असून ३१ मेपर्यंत नालेसफाई पूर्ण होईल, असा दावा मुंबई महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, मुंबई महापालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवणार असल्याचे म्हणत भाजप नेत्यांनी नालेसफाईच्या कामाची पोलखोल करण्यास सुरुवात केली आहे. तर चार दशकांहून अधिक काळ मुंबई महापालिकेत सत्तेचा उपभोग घेणाऱ्या शिवसेना नेत्यांनी कुठलीच सफाई दिलेली नाही. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई झालीच तर शिवसेना आणि प्रशासक भाजपचे टार्गेट असणार आहे. तर प्रशासकावर खापर फोडत शिवसेना नेते हातवर करणार यात दुमत नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई झाल्यास जबाबदार कोण? असा हा प्रश्न निरुत्तर आहे.

पावसाळ्यापूर्वी फक्त २५ टक्के गाळ काढणे शक्य

मुंबईत विविध प्राधिकरणाच्या माध्यमातून तब्बल ३०० हून अधिक कामे सुरू आहेत. मेट्रो रेल्वे, पूल बांधणे, रस्त्यांची कामे, नालेसफाई अशी विविध कामे सुरू असून त्यासाठी जवळपास संपूर्ण मुंबईत खोदकाम सुरू आहे. त्यामुळे मुंबईत डेब्रिज तयार होणारी ४५० ठिकाणे असून हिंदमाता किंग्ज सर्कल मिलन सब वे अशी फ्लडिंग पॉईंट्स आहेत. त्यात नालेसफाईच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ७० टक्के, पावसाळ्यात १५ टक्के आणि पावसाळ्यानंतर १५ टक्के नाल्यातील गाळ काढण्यात येतो. परंतु, यंदा नालेसफाईचे कंत्राटच उशिरा दिल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी फक्त २५ टक्के गाळ काढणे शक्य होणार आहे. तर, दुसरीकडे राजकीय नेते मंडळी नालेसफाईच्या आड आपली पोळी भाजून घेण्यात धन्यता मानतात. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होण्यास वेळ लागणार नाही, हेही तितकेच खरे आहे.

मुंबईकरांना काळजी घेणे गरजेचे

जून महिन्यात पावसाचे आगमन होते आणि पहिल्या पावसातच मुंबई जलमय होते. तसे होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाकडून भूमिगत टाक्या बसवल्या जात आहेत. पम्पिंग स्टेशन उभारण्यावर भर दिला जात आहे. प्रशासनाला या सगळ्यात लोकप्रतिनिधींचा आधार असतो. परंतु, यंदा ८ मार्चपासून नगरसेवकांचे अधिकार संपुष्टात आले आहेत. त्यामुळे प्रशासनाला थेट जाब विचारणारा कोणी वाली नाही. प्रशासकीय राज्य आल्यापासून माजी नगरसेवकांनाही वरिष्ठ पातळीवर भेटी नाकारल्या जात असल्याची चर्चा आहे. या चर्चेत किती सत्यता हे पडताळ्याची गरज नाही. मुंबई जलमय होणार नाही, यासाठी माजी नगरसेवक आणि प्रशासकीय यंत्रणेने काय केले, यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. मात्र, ‘प्रशासकीय राज्य आपल्या मस्तीत, माजी नगरसेवक आपल्या तंद्रीत’ त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

साथीचे आजार डोकेदुखी ठरणार

दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. यंदा पावसाळ्यापूर्वी कीटकनाशक फवारणी सुरू केली, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु, प्रशासकीय राज्य आल्यापासून अनेक भागात कचऱ्याचे ढीग जमा झाले असून, रुग्णालयात वेळीच उपचार मिळत नसल्याचे समोर आले. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात साथीचे आजार आरोग्य विभागासह सगळ्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. नालेसफाईच्या अपुऱ्या कामामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यात मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी पालिका प्रशासन नालेसफाईचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देते. यंदा तर ५४५ कोटींचे कंत्राट देण्यात आले असून अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे वरुणराजाच्या दुसऱ्या बँटिंगमध्ये खरे-खोटे वास्तव मुंबईकरांच्या समोर येईल. त्यामुळे नालेसफाईच्या नावाखाली खर्च करण्यात येणारे कोट्यवधी रुपये जातात कुठे? नालेसफाई नव्हे ही तर पालिका तिजोरीचीच सफाई, असेच सध्या मुंबई महापालिकेत दिसून येते.

वेळेत कामे पूर्ण होण्याची शक्यता कमी

८ मार्चपासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय राज्य आले आणि नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यामुळे स्थायी समिती, सभागृह, सुधार समिती आदी समित्यांच्या बैठकाच बंद झाल्या. प्रशासकीय राज्य येण्यापूर्वी विविध बैठकांमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक एकमेकांची उणीधुणी काढत असतात. परंतु, प्रशासकीय राज्य आल्यापासून नगरसेवक फक्त कागदावरच राहिले आहेत. प्रशासकीय राजवटीत करदात्या मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध होतील, असे चित्र निर्माण झाले होते; परंतु प्रशासकीय राज्य आल्यानंतर एक महिन्याने नालेसफाईच्या कामाला आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे यंदा वेळेत कामे पूर्ण होण्याची शक्यता कमी असून, मुंबईची तुंबई होण्यास राजकीय वाद कारणीभूत ठरणार आहेत.

नेते मंडळी सफाईत हुशार

मुंबईकरांशी निगडित काम कुठलेही असो, प्रत्येक काम सफाईने करण्यात प्रशासन तरबेज आहे. प्रशासनाबरोबर सत्ताधारी आणि विरोधकही पालिकेची साफसफाई करण्यात कमी नाही, हे प्रत्येक वर्षी दिसून येते. कार्यकाळ संपुष्टात आल्याने नगरसेवकांना थेट ‘सफाई’बाबत बोलण्याचे अधिकार नसले तरी आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते नालेसफाईच्या कामाच्या पाहणीत उतरले आहेत. नालेसफाईच्या कामावरून चिखलफेक सुरू झाली आहे. त्यामुळे नालेसफाई होवो अथवा न होवो, नेते मंडळी सफाईत हुशार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

तुंबापुरी झाल्यास जबाबदार कोण?

करदात्या मुंबईकरांना मूलभूत सुविधा पुरवणे प्रशासन, सत्ताधारी आणि विरोधकांचीही जबाबदारी आहे. यंदा निवडणूक लांबणीवर पडल्याने मुंबई महापालिकेत प्रशासकीय राज्य आहे. नगरसेवकांच्या अधिकारांवर गदा आली आहे. प्रशासकीय कारभार लेट लतीफ सुरू, त्यामुळे पावसाळ्यात मुंबई तुंबली तर जबाबदार कोण याचे उत्तर प्रशासन, माजी सत्ताधारी आणि माजी विरोधकांनी द्यायला हवे.

Related Stories

No stories found.