मुंबईत १.२८ लाख लोकांना भटक्या कुत्र्यांचा चावा; राज्यात श्वान दंशाच्या दररोज सरासरी १,३६९ घटना

२०२४ मध्ये मुंबईत १.२८ लाखांहून अधिक लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली असून श्वानांची संख्या नियंत्रित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण यांसारखी पावले उचलली आहेत.
मुंबईत १.२८ लाख लोकांना भटक्या कुत्र्यांचा चावा
मुंबईत १.२८ लाख लोकांना भटक्या कुत्र्यांचा चावा
Published on

नागपूर : २०२४ मध्ये मुंबईत १.२८ लाखांहून अधिक लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली असून श्वानांची संख्या नियंत्रित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण यांसारखी पावले उचलली आहेत.

गेल्या सहा वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात नोंदवलेल्या कुत्र्यांच्या चाव्याच्या ३० लाखांहून अधिक प्रकरणांमध्ये या आकडेवारीचा समावेश आहे. यानुसार राज्यात दररोज सरासरी १,३६९ अशा घटना घडतात.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत आमदार सुनील शिंदे, वसंत खंडेलवाल, संदीप जोशी आणि इतरांनी विचारलेल्या प्रश्नांना लेखी उत्तर देताना याबाबत माहिती दिली. आमदारांनी बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागपूरमधील अशाच प्रकारच्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण तसेच रेबीज निर्मूलन यांसारखी अनेक पावले आणि कार्यक्रम त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी हाती घेण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

या समस्येशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एक स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. आक्रमक आणि रेबीज झालेल्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्रे उभारण्यासाठी जागा शोधल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

शिंदे यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले होते की, राज्यातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या प्रकरणांव्यतिरिक्त, २०२१ ते २०२३ दरम्यान रेबीजमुळे ३० लोकांचा मृत्यू झाला आहे.

नागपूरमध्ये ९,४०० हून अधिकांना चावा

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये २०२४ मध्ये ९,४०० हून अधिक लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला.

  • नागपूर महानगरपालिका हद्दीत ९,४२७ लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला, तर २०२४ च्या आकडेवारीनुसार मुंबईत १,२८,२५२ लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला.

  • प्राणी कल्याण मंडळाच्या नियमांनुसार, 'ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल'च्या माध्यमातून मुंबई महापालिकेनेकेलेल्या सर्वेक्षणानुसार, भटक्या कुत्र्यांची संख्या २०१४ मधील ९५,१७२ वरून २०२४ मध्ये ९०,७५७ पर्यंत खाली आली आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in